समाजवादी पक्ष आणि यादव कुटुंबामध्ये एकी आहे असे स्पष्टीकरण देत मुलायमसिंह यादव यांनी पक्षातील यादवीवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. पुढचा मुख्यमंत्री बहुमतावर ठरेल असे सांगत मुलायमसिंह यांनी पुन्हा एकदा यू टर्न घेतला  आहे.

समाजवादी पक्षात सध्या कौटुंबिक कलह सुरु असून या वादाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी मुलायमसिंह यादव यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी सारं काही आलबेल असल्याचा दावा केला असला तरी मुलायमसिंह यांचे चिरंजीव आणि मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी मात्र या पत्रकार परिषदेला दांडी मारली. अखिलेश यादव यांचे समर्थक रामगोपाल यादव यांच्याविषयी विचारले असता मुलायमसिंह म्हणाले, मी आता त्यांच्या बोलण्याला फारसे महत्त्व देत नाही. या संपूर्ण पत्रकार परिषदेत मुलायमसिंह यादव यांच्यावर प्रश्नाचा भडीमार झाला. पक्षातील दुफळीवरही त्यांना असंख्य प्रश्न विचारण्यात आले. पण मुलायमसिंह यांनी कोणत्याही प्रश्नावर थेट उत्तर देणे टाळले. तुम्ही मला वादग्रस्त प्रश्न विचारत आहात. पण मी कोणतेही वादग्रस्त उत्तर देणार नाही. मी राममनोहर लोहिया यांच्या विचारधारेवर चालतो. आमच्या पक्षात आणि कुटुंबात एकी आहे असे त्यांनी सांगितले. निवडणुकीनंतर आमचे सरकार बहुमताने येऊ द्या मग मुख्यमंत्रीपदाचे बघू असे त्यांनी म्हटले आहे.

अमरसिंह आणि शिवपाल यादव यांनी कटकारस्थान केल्याचा दावा अखिलेश यादव यांनी केला होता.  यासंदर्भात विचारले असता ‘आता अमरसिंह यांना मध्ये आणू नका’ अशी प्रतिक्रिया मुलायमसिंह यांनी दिली. शिवपाल यादव आणि हकालपट्टी केलेल्या अन्य तिघा मंत्र्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेणार का असा प्रश्नही मुलायमसिंह यांना विचारण्यात आला. यावर मुलायमसिंह म्हणाले, २०१२ मध्ये आम्हाला बहुमत मिळाले. मी मुख्यमंत्री व्हावे असे सर्वांना वाटत होते. पण अखिलेश यादव यांना आम्ही मुख्यमंत्री केले. आता सत्ता कशी चालवायची आणि सरकारमध्ये कोणाला घ्यायचे हे निर्णय तेच घेतील असे मुलायमसिंह यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेत मुलायमसिंह यांच्यासोबत शिवपाल यादव उपस्थित होते. पण अखिलेश यादव यांची गैरहजेरी ही पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे.