उत्तर प्रदेशमधील आग्रा एक्स्प्रेस वेवर हवाई दलाच्या विमानांचा सराव सुरु झाला आहे. युद्ध किंवा युद्धसदृश्य कारवायांसाठी सज्ज राहण्यासाठी हवाई दलाकडून हा सराव केला जात आहे. विशेष म्हणजे यंदा हवाई दलाचे सी-१३० जे सुपर हर्क्युलिस हे वाहतूक विमानदेखील आग्रा एक्स्प्रेस वेवर उतरले आहे. हवाई दलाचे वाहतूक विमान सरावादरम्यान एक्स्प्रेसवर उतरण्याची ही पहिलीच वेळ आहे. सकाळी १० वाजल्यापासून या सरावाला सुरुवात झाली असून या सरावामध्ये एकूण २० विमानांचा समावेश आहे.

वाहतूक विमान सी-१३० जे सुपर हर्क्युलिसने टचडाऊन करताच आग्रा एक्स्प्रेस वेवर हवाई दलाच्या सरावाला सुरुवात झाली. हर्क्युलिस विमानाने लँडिंग केल्यावर त्यातून गरुड कमांडो एक्स्प्रेस वेवर उतरले. यानंतर त्यांनी संपूर्ण रनवे ताब्यात घेतला. यानंतर साडे तीन किलोमीटरच्या पट्ट्यात हवाई दलाची विमाने उतरण्यास सुरुवात झाली. कोणत्याही आपत्कालीन स्थितीचा सामना करण्याचा अभ्यास म्हणून हवाई दलाकडून आग्रा एक्स्प्रेस वेवर सराव सुरु आहे. वाहतूक विमान सी-१३० जे सुपर हर्क्युलिस सरावाचे मुख्य आकर्षण ठरले आहे.

आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस वेवर उन्नव जिल्ह्याजवळ हवाई दलाचा सराव सुरु असून यामध्ये २० विमानांचा समावेश आहे. लढाऊ आणि वाहतूक अशा दोन्ही प्रकारची विमाने यामध्ये सहभागी झाली आहेत. या सरावादरम्यान मिराज २०००, जॅग्वार, सुखोई ३० आणि एएन-३२ विमाने एक्स्प्रेसवर वेवर उतरली आहेत. हवाई दलाच्या या सरावासाठी एक्स्प्रेस वे २० ऑक्टोबरपासून बंद ठेवण्यात आला आहे. या काळात आग्रा एक्स्प्रेस वेवरील उन्नवजवळील अरौल ते लखनऊ दरम्यानची वाहतूक बंद ठेवण्यात आली.

गेल्या वर्षीही आग्रा एक्स्प्रेस वेवर हवाई दलाच्या विमानांनी सराव केला होता. मात्र त्यावेळी झालेल्या सरावात वाहतूक विमानांचा समावेश नव्हता. यंदा पहिल्यांदाच हवाई दलाच्या अशा प्रकारच्या अभ्यासात वाहतूक विमानांचा समावेश करण्यात आला. गेल्या वर्षी आग्रा एक्स्प्रेस वेवर झालेल्या सरावात आठ लढाऊ विमाने सहभागी झाली होती.