जगात हरितगृह वायूंचे प्रमाण खूपच वाढले असून आक्र्टिकचे बर्फ वितळत आहे त्यामुळे २०१३ हे वर्ष सर्वात उष्ण वर्षांमध्ये नोंदले गेले आहे असे २०१३ च्या जागतिक हवामान अहवालात म्हटले आहे.  
  गेल्या संपूर्ण वर्षभरातील वैज्ञानिक माहिती व हवामानविषयक घटना यांचे संकलन ५७ देशांच्या ४२५ वैज्ञानिकांनी केले त्याच्या आधारे हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत.
  नॅशनल ओशनिक अँड अ‍ॅटमॉस्फेरिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशनच्या नॅशनल क्लायमेटिक डाटा सेंटरचे संचालक टॉम कार्ल यांनी सांगितले आपण माणसाची वैद्यकीय तपासणी करताना जसे विशिष्ट घटक तपासतो तसे आम्ही हवामानाचे घटक तपासले आहेत. गेल्या काही दशकातील जागतिक तापमानवाढीचा कल अजूनही कायम आहे असे सांगून ते म्हणाले की, कुठल्याही आधुनिक संस्कृतीच्या काळापेक्षा हवामानाची स्थिती फार वेगाने बदलत आहे. जगातील सर्वात जास्त तापमानाची नोंद २०१३ मध्ये झाली. ऑस्ट्रेलियात गेल्या वर्षी उष्णतामान सर्वाधिक होते. अजेर्ंटिनाचा क्रमाक त्याखालोखाल लागला व न्यूझीलंडचे तापमान तिसऱ्या क्रमांकावर राहिले.
   सागरी जलाचे तापमान गेल्या वर्षी सर्वात जास्त राहिले. आक्र्टिकमध्ये सातवे जास्त उष्णतामान असलेले वर्ष होते. १९७८ च्या उपग्रह निरीक्षणानंतर आक्र्टिकचे हिमाच्छादन सर्वात कमी राहिले आहे. हिवाळ्याच्या शेवटी मात्र तेथील हिमाचे प्रमाण वाढते. दशकभरात हिमाची वाढ हिवाळ्यात १ ते २ टक्के आहे. अंटाक्र्टिकपेक्षा येथील हिमाच्छादन वेगळे का आहे याबाबत वेलिंग्टनच्या व्हिक्टोरिया विद्यापीठाच्या भूगोल विभागाचे सहायक प्राध्यापक जेम्स रेनविक यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. अमेरिकन मीटिरॉलॉजिकल सोसायटीच्या वार्तापत्रात हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.