डेंग्यूच्या डासांशी सामना करण्यासाठी जनुकसंस्कारित डासांच्या चाचण्या भारतात करू द्याव्यात, अशी गळ ब्रिटनच्या एका कंपनीने घातली आहे.
 जनुकसंस्कारित डासाचे नामकरण ‘५१३ ए’ असे करण्यात आले असून या डासाची पिल्ले प्रौढत्व येण्याच्या आधी (२-५ दिवसात)  मरतात. त्यामुळे डेंग्यूच्या डासांचे नियंत्रण होते. जनुकसंस्कारित डासांच्या चाचण्या ब्राझीलमध्ये करण्यात आल्या आहेत.
ब्राझीलमध्ये डेंग्यूचे प्रमाण फुटबॉल जागतिक करंडक सामन्यांच्यावेळी मोठे होते. केमन बेटांवरही या डासांच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. इंग्लंडच्या ऑक्सिटेक या ऑक्सफर्ड विद्यापीठाशी संबंधित कंपनीने कीटक नियंत्रणाचे हे तंत्र विकसित केले असून त्यांनी त्याची चाचणी भारतात करण्याची परवानगी सरकारकडे मागितली आहे. कंपनीच्या प्रवक्तयाने सांगितले की, सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांना डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी हे तंत्रज्ञान उपलब्ध करून देता येईल. ऑक्सिटेक कंपनी जीबिट या भारतीय खासगी कंपनीबरोबर काम करते व आरोग्य, शेती क्षेत्रात अभिनव तंत्रज्ञान विकसित करण्यात ती आघाडीवर आहे.
भारतात दरवर्षी डेंग्यूचे हजारो रूग्ण असतात. आमचे संशोधन प्राथमिक पातळीवर असून डेंग्यूच्या प्रमुख कारण ठरणाऱ्या घटकांवर त्याचे प्रयोग नंतर केले जातील. डासांना टेट्रासायक्लीनचा प्रतिडोस देऊन त्यांचे जनुकीय नियंत्रण केले जाते. जीबिट कंपनीला प्रयोगशाळेत प्रयोग करण्यास परवानगी दिली आहे. असे असले तरी या तंत्रज्ञानाच्या मोठय़ा प्रमाणात चाचण्या करण्यासाठी परवानगी मागण्यात आली आहे. डेंग्यूच्या डासामुळे चिकनगुन्या व यलो फिव्हर असे आजारही होतात.
जनुकसंस्कारित डासांचा समागम मादी डासांशी होतो व  त्यांचा वापर डेंग्यूच्या डासांवर करता येतो. जनुकसंस्कारित नर डास सोडून डेंग्यूच्या डासांचा नायनाट करता येतो. प्रत्येक मादी डासाचा या डासाशी समागम झाल्यानंतर एक विशिष्ट जनुक शरीरात असलेले डास जन्माला घालतो. पण ते जगत नाहीत.