स्त्री-पुरूष समानता आता अभ्यासक्रमातही दाखवली जाणार असून शाळांमध्ये मुलग्यांनाही गृहविज्ञान (होम सायन्स) हा विषय सक्तीचा केला जाण्याची शक्यता आहे. या आशयाचा प्रस्ताव महिला व बालकल्याण मंत्रालयाने तयार केला असून तो केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्य करणे बाकी आहे. या तरतुदीची शिफारस असलेले राष्ट्रीय महिला धोरण २०१७ चा मसुदा मंत्रिगटाने मंत्रिमंडळाकडे पाठवला आहे असे महिला व बालकल्याण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले. या प्रस्तावाच्या मसुद्यात अनेक सूचनांचा समावेश असून लिंगभावनिगडित कामात भेदभाव बालपणापासूनच टाळण्याचा त्यात उद्देश आहे.

महिलांना करसवलती व रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून द्याव्यात असेही त्यात म्हटले आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयाने अभ्यासक्रमात लिंगभाव संवेदनशीलता दाखवणे गरजेचे असून त्यात गृहविज्ञान व शारीरिक शिक्षण हे विषय मुलगे व मुली यांना सक्तीचे करावेत. सध्या मुलींच्या शारीरिक शिक्षणाकडे दुर्लक्ष होते व मुलांना स्वयंपाकपाण्याचे धडे देणारे गृहविज्ञान शिकवले जात नाही. महिला व पुरुषांना समानपदासाठी समान वेतन, करसवलती, कंपन्या, व्यावसायिक संकुलात लहान मुलांना ठेवण्यासाठी खास सुविधा, विधवा व घटस्फोटित महिलांना कर सवलती, शाळांच्या बस महिला चालकांना चालवण्यास देणे यांसारख्या सूचना यात आहेत. यात रोजगार संधी वाढून शाळकरी विद्यार्थ्यांवरचे लैंगिक अत्याचार कमी होतील.