चलनसंषर्घ चिघळला : बाजार कोसळला रुपया घसरला

जुन्या नोटा बदलण्यासाठी बँकांच्या शाखांसमोर दिवसेंदिवस फुगत चाललेल्या रांगा, रागांमध्ये उभ्या असलेल्या नागरिकांच्या चेहऱ्यावर वाढत चाललेला त्रागा, त्या जोडीला काळा पैसा पांढरा करून घेण्यासाठी लढवल्या जात असलेल्या क्लृप्त्या.. या सगळ्याच्या कात्रीत सापडलेल्या केंद्र सरकारची अस्वस्थताच मंगळवारी निदर्शनास आली. म्हणूनच बँकेत नोटा बदलण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या उजव्या बोटावर शाई लावली जाईल, असा निर्णय केंद्र सरकारला घाईघाईत जाहीर करावा लागला. हे कमी म्हणून की काय, चलनात आलेल्या दोन हजाराच्या कोऱ्याकरकरीत नोटांचा रंग उडत असला तरी त्याच अस्सल नोटा असल्याचा खुलासा केंद्रातर्फे करण्यात आल्याने गोंधळात भरच पडली. त्यातच तीन दिवसांच्या सुट्टीनंतर सुरू झालेला भांडवली बाजार चलनगोंधळामुळे निरुत्साहीच राहिला तर रुपयाचे मान टाकणेही कायम राहिले..

गोंधळात शाईची भर

पाचशे-हजाराच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर प्रचंड प्रमाणात काळा पैसा उघड होईल, हा केंद्र सरकारचा अंदाज काहीसा फोल ठरत असल्याचे निदर्शनास येत आहे. आपल्याकडील  काळा पैसा पांढरा करून घेण्यासाठी काळा पैसाधारकांकडून विविध क्लृप्त्या योजल्या जात आहेत. इतरांच्या जनधन खात्यावर पैसे जमा कर, प्रामाणिक करदात्याला हाताशी धरून त्याच्यामार्फत जुन्या नोटा बदलून घे, त्याच प्रामाणिकाला एका बँकेतून दुसऱ्या बँकेत पिटाळून त्याच्याकडून पुन:पुन्हा नोटा बदलून घे, एखाद्या मध्यस्थाला पकडून तिऱ्हाईताच्या बँक खात्यावर मोठी रक्कम जमा कर.. वगैरे प्रकार सध्या सुरू आहेत. केंद्राकडून मात्र, आम्ही सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत, काळा पैसा पांढरा करणाऱ्यांवर आमची करडी नजर आहे, वगैरे छापाची ग्वाही दिली जात आहे. असे असूनही चलनकल्लोळाची सर्वाधिक झळ सामान्यांनाच पोहोचत आहे. या सर्व पाश्र्वभूमीवर केंद्राने काळा पैसा पांढरा करण्याच्या प्रयत्नांना चाप लावण्यासाठी एक नवी शक्कल लढवली आहे. जो कोणी जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी बँकेत येईल, त्याच्या उजव्या बोटावर शाई लावली जाईल, असे केंद्रीय अर्थव्यवहार सचिव शक्तिकांत दास यांनी मंगळवारी जाहीर केले. सर्व मोठय़ा शहरांमधील बँकांत ही योजना बुधवारपासून अमलात आणण्यात येणार आहे. शाईमुळे पैसे बदलून घेण्यावर मर्यादा येईल, असे दास यांचे म्हणणे आहे.

निवृत्तांना निमंत्रण

चलनकल्लोळामुळे विविध बँकांच्या कर्मचाऱ्यांना दररोज नानाविध आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. त्यावर बँकांनी आपापल्या निवृत्त कर्मचाऱ्यांना निमंत्रित करून प्राप्त परिस्थितीत त्यांची मदत घ्यावी अशी सूचना केंद्राने बँकांना केली आहे. त्यासंदर्भात वित्त विभागाने इंडियन बँक असोसिएशनला पत्र लिहिले आहे.

रंग उडणारीच नोट अस्सल..

जुन्या नोटांच्या बदल्यात हाती येणाऱ्या कोऱ्या करकरीत दोन हजाराच्या नोटेबरोबर स्वयंप्रतिमा काढून झाल्यावर ती बाजारात चलनात आणताना अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या नोटेबाबत बऱ्याच अफवाही पसरवल्या जात आहेत. नोट ओली झाली तर तिचा रंग फिका पडतो, अशीच एक अफवा त्यापैकी एक. याबाबत शक्तिकांत दास यांना विचारले असता ते म्हणाले, ‘जुन्या शंभर व पाचशे रुपयांच्या नोटांप्रमाणेच दोन हजारच्या नोटांमध्येही इंटाग्लिओ शाई वापरली आहे. त्यांच्यामुळे नोटेचा रंग फिकट होत जातोच. त्यात नवे काही नाही. किंबहुना रंग न उडणारी किंवा फिकट न पडणारीच नोट बनावट असू शकते.’

आठ दिवसांनंतरही बँकांसमोरील गर्दी कमी होत नसल्याची कारणे तपासली असता अनेक जण पुनपुन्हा रांगेत उभे राहत असल्याचे लक्षात आले. काळा पैसा पांढरा करण्यासाठी काही धनदांडगी मंडळी अनेकांना बँकांमध्ये वारंवार पाठवीत असल्याचे त्यातून स्पष्ट झाले. हे प्रकार रोखण्यासाठी शाई लावण्याचा निर्णय घेतला.

– शक्तिकांत दास, केंद्रीय अर्थव्यवहार सचिव