तीन लाख अनोंदणीकृत कंपन्यांना नोटीस

देशातील किमान ९ लाख नोंदणीकृत कंपन्यांनी कंपनी कामकाज मंत्रालयाकडे वार्षिक विवरणपत्रे सादर केलेली नाहीत, त्यातून त्यांनी पैसा दडवल्याचे स्पष्ट होते, असे महसूल सचिव हसमुख अढिया यांनी म्हटले आहे. कंपनी कामकाज मंत्रालयाने तीन लाख अनोंदणीकृत कंपन्यांना नोटीस पाठवली आहे. सक्तवसुली दिनानिमित्त अढिया यांनी सांगितले की, एकूण १५ लाख कंपन्यांपैकी ६ लाख कंपन्यांनी त्यांची विवरणपत्रे भरली असून त्यात वार्षिक लेखा अहवालही सादर केला आहे.

देशात जर ८-९ लाख कंपन्या विवरणपत्रे सरकारला सादर करीत नसतील तर त्यांच्यामुळे काळ्या पैशाचा धोका आहे व त्यामुळे त्याची दखल घेतली जात आहे, असे सांगून अढिया म्हणाले की, फेब्रुवारीत काही कंपन्यांवर छापे टाकून त्यांच्यावर करचुकवेगिरीबाबत कारवाई करण्यात आली. याबाबत विशेष कामगिरी दल स्थापन करण्यात आले असून एमसीएकडे नोंदणी करूनही जर कंपन्या विवरणपत्रे दाखल करत नसतील तर त्यांच्यापासून धोका आहे व त्यामुळेच आम्ही कारवाईचे धोरण ठेवले आहे. ज्या ९ लाख कंपन्यांनी विवरणपत्रे भरली नाहीत त्या सर्वच बनावट किंवा गैरव्यवहार करणाऱ्या कंपन्या आहेत असे आमचे म्हणणे नाही. प्राप्तिकर खात्याकडे जी माहिती आहे त्यानुसार भारतात एकूण १५ लाख नोंदणीकृत कंपन्या असल्या तरी त्यांच्यापैकी ६ लाख कंपन्यांनी विवरण पत्रे भरली आहेत.