यूपीए सरकारने गेल्या आठ वर्षांत साधलेल्या सर्वांगीण विकासाचे दाखले देत मनमोहन सिंग यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत जनतेपुढे जाताना पक्षाने आपल्या कामगिरीची योग्य माहिती मांडावी आणि कामगिरीतील त्रुटीही प्रामाणिकपणे स्वीकाराव्या. देशाच्या भविष्यासाठी आमची स्वप्ने कोणती आहेत आणि ती आम्ही कशी साध्य करणार याचीही आम्ही देशवासियांना माहिती द्यायला हवी, अशी अपेक्षा मनमोहन सिंग यांनी रविवारी तीन दिवसांच्या चिंतन शिबिराअखेर झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात बोलताना व्यक्त केली.
मनमोहन सिंग यांनी देशापुढील आर्थिक आव्हानांचा परामर्श घेतला. अन्य देशांच्या तुलनेत भारताचा आर्थिक विकास दर अजूनही चांगला असून तो आणखी तीव्र करण्यासाठी कठोर मेहनत सुरु आहे, असे ते म्हणाले. यूपीएच्या शासनकाळात महागाईचा दर सरासरीपेक्षा जास्त राहिला, अशी कबुली त्यांनी दिली. आंतरराष्ट्रीय बाजारात भडकलेले पेट्रोलियम पदार्थांचे दर आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी वाढविलेल्या किमान समर्थन मूल्यांमुळे ही स्थिती उद्भवली असून २०१३-१४ मध्ये महागाई कमी करण्यासाठी ठोस पावले उचलण्यावर त्यांनी भर दिला. पाकिस्तानशी असलेल्या भारताच्या संबंधांचा आम्ही सतत आढावा घेत असून  ८ जानेवारी रोजी नियंत्रण रेषेवर झालेल्या अमानवीय कृत्याचा उभय देशांच्या संबंधांवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. या संदर्भात आम्हाला कोणतीही कारवाई विचारपूर्वक करावी लागेल. पाकिस्तानशी आम्हाला मैत्री हवी आहे. पण त्यासाठी त्यांनाही प्रयत्न करावे लागतील, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. देशासाठी काय करायला हवे, याची समज केवळ काँग्रेस पक्षालाच आहे. अन्य कोणताही पक्ष असा दावा करू शकत नाही, असे ते म्हणाले. देशासाठी काय करायला हवे, याची समज केवळ काँग्रेस पक्षालाच आहे. अन्य कोणताही पक्ष असा दावा करू शकत नाही, असे ते म्हणाले.