हार्वर्ड बिझिनेस स्कूलमधील संशोधकांचा दावा

सुख कशात असतं, मानलं तर छोटय़ाशा गोष्टींमध्ये. म्हणजे सुख हे मानण्यावर असतं. पण अलीकडच्या काळात सुखाच्या व्याख्या विविध परिमाणांच्या आधारे सांगितल्या जात आहेत. मध्य प्रदेशसारख्या राज्याने तर जनतेला सुखी, समाधानी करण्यासाठी खास मंत्रालयच स्थापन केले आहे. सुख हे पैशाने विकत घेता येत नाही असे सगळेच जण म्हणतात, पण आता संशोधकांनी सुख पैशाने विकत घेता येतं असा दावा केला आहे.

घरची कामे मोलकरणींना, नोकरांना देऊन रिकामा वेळ पदरात पाडून घेणाऱ्यांना आयुष्यातील समाधान वाढल्याचा अनुभव येतो, त्यामुळे पैशाने सुख विकत घेता येत नाही हे खरे नाही, असा दावा अमेरिकेतील हार्वर्ड बिझिनेस स्कूलमधील सहायक प्राध्यापक अ‍ॅशले व्हिलियन यांनी केला आहे.

अनेक लोक मोलकरणीच्या अंगावर कामे टाकून मोकळे होतात. पुरुषही त्यांची कामे नोकर ठेवून करून घेतात. शेजारच्या मुलाला लॉन कापण्याचे काम देऊन काही जण आरामात बसून राहतात, आपल्या सर्वाना हा सगळा आळशीपणाचा प्रकार वाटतो हे खरेच, पण असा मोकळा वेळ विकत घेण्याने सुख वाढते, पण त्यासाठी पैसा मात्र सोडावा लागतो असा दावा संशोधनात केला आहे. या संशोधकांनी अमेरिका, डेन्मार्क, कॅनडा व नेदरलँड्स या देशातील सहा हजार प्रौढांची पाहणी केली. त्यात या लोकांना मोकळा वेळ मिळण्यासाठी दर महिन्याला किती खर्च करता, त्यातून समाधान मिळते का, वेळेचा उपयोग कसा करता, असे अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्यांच्या उत्तरांच्या आधारे जे लोक वेळ वाचवण्यासाठी पैसा खर्च करतात त्यांना जास्त सुख, समाधान मिळत असल्याचा निष्कर्ष निघाला. वेळ विकत घेण्याचा फायदा केवळ श्रीमंतांनाच मिळतो असे नाही असे कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठाच्या एलिझाबेथ डन यांचे म्हणणे आहे. सर्व उत्पन्न गटात त्यांच्या क्षमतेनुसार केलेल्या खर्चाने हा परिणाम दिसतो.

प्रयोग आणि निष्कर्ष

एका प्रयोगात सहा प्रौढांना ४० डॉलर्स वेळ वाचवण्यासाठी दर आठवडाअखेरीस देण्यात आले, तर दुसऱ्या आठवडाअखेरीस ४० डॉलर्स वस्तू खरेदीसाठी देण्यात आले. यात ज्यांनी वस्तू खरेदी केल्या त्यांच्यापेक्षा ज्यांनी कामाला माणसे ठेवून वेळ खरेदी केला त्यांना जास्त सुख, समाधान मिळालेले दिसले. दैनंदिन खर्च वाचवून तो पैसा वेळ वाचवण्यासाठी खर्च करण्याकडे लोकांचा कल कमी आहे. किमान ८५० कोटय़धीश व्यक्तींचा अभ्यास केला असता त्यातील निम्म्या लोकांनी वेळ वाचवण्यासाठी पैसा खर्च करण्यात काटकसर केलेली दिसून आली. ४० डॉलर्स खर्च करण्यासाठी दिलेल्या ९८ लोकांना विचारले असता त्यातील केवळ दोन टक्के लोकांनी वेळ वाचवण्यावर खर्च करू असे उत्तर दिले. वेळ वाचवल्याने आपल्याला आवडीचे छंद किंवा इतर गोष्टी जोपासता येतात. बरेच लोक त्यांना परवडत असूनही तसे करीत नाहीत असे डन यांचे म्हणणे आहे.