फेसबुक वॉलवरून दुर्गा देवीबाबत वादग्रस्त लिखाण केल्याप्रकरणी दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक केदार कुमार मंडल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भारतीय पौराणिक कथेतील दुर्गादेवीबाबत त्यांनी आक्षेपार्ह पोस्ट फेसबुकवर टाकली होती. या पोस्टमुळे अनेकांच्या धार्मिक भावना दुखावल्याने प्रा. मंडल हे नेटकऱ्यांच्या टीकेचे धनी झाले. त्यांना फेसबुकवर मोठ्या ट्रोलिंगला सामोरे जावे लागले. केदार कुमार मंडल हे दिल्ली विद्यापीठाशी संलग्नित दयालसिंह महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक आहेत.

मंडल यांच्या या वक्तव्यामुळे त्यांना विद्यार्थी संघटनांच्या रोषालाही सामोरे जावे लागले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) आणि नॅशनल स्टुडंटस युनियन ऑफ इंडिया (एनएसयूआय) या विद्यार्थी संघटनांनी प्रा. मंडल यांच्या बडतर्फीची मागणी केली आहे.

याप्रकरणी लोदी रोड पोलीस स्थानकात शनिवारी तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर मंडल यांच्यावर भादंवि १५३ ए आणि २९५ ए अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

सध्या नवरात्रीचे दिवस सुरु असून या काळात देवी दुर्गाचे विशेष धार्मिक महत्व असते. या काळात हिंदू धर्मातील विविध देवींचा जागर केला जातो. या नऊ दिवसांत देवी नऊ अवतारात अवतरत असते, अशी लोकांची भावना आहे.