न्यू जर्सीतील कार्यक्रमात डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन

भारत हा आमचा ‘सामरिकदृष्टय़ा महत्त्वाचा मित्र’ असून आपण निवडून आल्यास भारत आणि अमेरिका हे ‘सवरेत्कृष्ट मित्र’ बनतील आणि एकत्रितपणे त्यांचे ‘अभूतपूर्व भविष्य’ राहील, असे रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.

भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असून अमेरिकेचा नैसर्गिक मित्र आहे. ट्रम्प प्रशासनात आम्ही आणखी चांगलेच नव्हे तर सर्वोत्तम मित्र बनू, असे रिपब्लिकन हिंदू कोअ‍ॅलिशनने आयोजित केलेल्या भारतीय अमेरिकी लोकांच्या गर्दीसमोर बोलताना ट्रम्प म्हणाले.

आम्ही मुक्त व्यापारास अनुकूल आहोत आणि इतर देशांशी आम्ही चांगले व्यापारी करार करू. भारतासोबत तर आमचा व्यापार फार मोठा राहील. एकूणच आम्ही अभूतपूर्व भविष्याकडे एकत्र वाटचाल करू, असे ट्रम्प म्हणाले. आर्थिक सुधारणा आणि नोकरशाहीतील सुधारणा यांच्या मालिकेद्वारे देशाला जलदगती विकासाच्या पथावर नेत असल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा केली.

अमेरिकेतील यंदाच्या निवडणुकीच्या मोसमात अध्यक्षपदाच्या कुणा उमेदवाराने भारतीय वंशाच्या अमेरिकी लोकांच्या मेळाव्यात हजर राहण्याचा हा पहिलाच प्रसंग होता.

मी भारताचा, तसेच हिंदूंचा मोठा चाहता आहे. मी विजयी झाल्यास भारतीय आणि हिंदू समुदायाला व्हाइट हाऊसमध्ये एक सच्चा मित्र मिळेल, असे काश्मिरी पंडित आणि बांगलादेशातील हिंदू दहशतवादाचे बळी असलेल्या लोकांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ट्रम्प यांनी सांगितले. दहशतवादाच्या विरोधात भारताने घेतलेल्या भूमिकेची त्यांनी प्रशंसा केली.

यापूर्वी मुंबईवरील हल्ल्यासह दहशतवादाची क्रूरता भारताने अनुभवली आहे. मुंबईवरील आणि भारतीय संसदेवरील दहशतवादी हल्ले हे अतिशय अपमानजनक होते, हे त्यांनी आवर्जून सांगितले.

ट्रम्प यांना भारतीयांचा पाठिंबा

दहशतवादाविरुद्ध लढा देणे आणि अर्थव्यवस्थेला बळकटी आणणे याबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या प्रतिज्ञेला पाठिंबा देण्यासाठी ५ हजारांहून अधिक भारतीय अमेरिकी लोक या कार्यक्रमाला हजर होते. न्यू जर्सी कन्व्हेन्शन अ‍ॅण्ड एक्स्पो सेंटरमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला ट्रम्प यांनी सुमारे १३ मिनिटे हजेरी लावली. या वेळी बॉलीवूडमधील तारे-तारकांनी मनोरंजनाचा कार्यक्रम सादर केला.

ट्रम्प यांची ड्रग टेस्टची  मागणी

डेमॉक्रॅटिक पक्षाच्या आपल्या प्रतिस्पर्धी हिलरी क्लिंटन यांच्या शारीरिक क्षमतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत, येत्या आठवडय़ात लास वेगास येथे होणाऱ्या तिसऱ्या व अंतिम वादापूर्वी (प्रेसिडेन्शिअल डिबेट) अध्यक्षपदाच्या दोन्ही उमेदवारांची ‘ड्रग टेस्ट’ घेण्यात यावी, अशी मागणी आतापर्यंत अनेक वादग्रस्त विधाने करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनी केली.

निवडणुकीला आव्हान

स्वत: निवडणूक लढवत असलेल्या आणि वादांनी वेढल्या गेलेल्या ट्रम्प यांनी रविवारी निराधार दावे करून अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या वैधतेलाच सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला. आपण निवडून आल्यास हिलरी क्लिंटन यांना तुरुंगात पाठवण्याच्या शपथेचा पुनरुच्चार करतानाच, आपल्या प्रतिस्पर्धी औषधांच्या मदतीने तगून असल्याचा आरोप त्यांनी केला.

संपूर्णपणे खोटे आरोप लावून धरणाऱ्या भ्रष्टाचारी प्रसारमाध्यमांनी ही निवडणूक आपल्या ताब्यात घेतली असल्याची टीका ट्रम्प यांनी केली. ट्रम्प यांनी आपल्याशी लगट केल्याचे किंवा आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे सांगणाऱ्या अनेक महिला अलीकडच्या काळात पुढे आल्या आहेत, त्यांच्या संदर्भात त्यांचे हे विधान होते. ट्रम्प यांनी या महिला ‘खोटारडय़ा’ असल्याचे सांगून आपल्यावरील आरोपांचे खंडन केले आहे.

कार्यक्रम स्थगित

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील ‘लॉ अ‍ॅण्ड ऑर्डर : स्पेशल व्हिक्टिम्स युनिट’ हा कार्यक्रम येत्या महिन्यात अध्यक्षीय निवडणूक पूर्ण होईपर्यंत न दाखवण्याचे एनबीसी टीव्हीने ठरवले आहे. नियोजित वेळापत्रकानुसार २६ ऑक्टोबरला नियोजित असलेला ‘अनस्टॉपेबल’ या शीर्षकाचा हा कार्यक्रम सध्या स्थगित ठेवण्यात आल्याचे वृत्त एस शोबिझने दिले आहे.