आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त लंडनमधील एका जाहिरात एजन्सीने डिजिटल कल्पक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जाहिरात फलकावर एक अभिनव कल्पना साकारली आहे. या फलकावर एक जखमी महिला दिसते आणि जसजसे लोक या जखमांकडे नजर टाकतात, तसतशा त्या जखमा पुसट होत जातात..
‘लुक अ‍ॅट मी’ नावाची ही जाहिरात लंडन येथील डब्ल्यूसीआरएस या क्रिएटिव्ह एजन्सीने तयार केली असून त्यात अभिनव तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला आहे. गुरुवारपासून लंडन शहरभर ही जाहिरात झळकू लागली आहे. मोठय़ा आकाराच्या जाहिरात फलकावर एक महिला दिसते. जोपर्यंत या चित्राकडे कुणाचे लक्ष नसते, तोपर्यंत तिच्या जखमा कायम राहतात. मात्र, जसजसे रस्त्यावरून जाणारे लोक या महिलेकडे पाहतात, तसतशा तिच्या जखमा पुसट होत जाऊन हळूहळू नाहीशा होतात.
‘विमेन्स एड’ नावाच्या एका धर्मादाय संस्थेला देणगी देण्यासाठी लोकांना उद्युक्त करण्याच्या उद्देशाने हे जाहिरात फलक तयार करण्यात आले आहेत. ही संस्था महिलांवरील कौटुंबिक हिंसाचार संपवण्याच्या उद्देशाने काम करते. ही जाहिरात लंडनवासीयांमध्ये लोकप्रिय ठरली असून, अनेकांनी ‘ट्विटर’वर तिचा संदर्भ दिला आहे.