भारत भेटीच्या पूर्वसंध्येला इंडोनेशियाच्या अध्यक्षांचे मत

दहशतवादी हल्ल्यापासून कोणताही देश मुक्त नसल्याने भारत आणि इंडोनेशिया यांनी संरक्षण, सुरक्षा आणि दहशतवाद प्रतिबंधक क्षेत्रांत सहकार्य केले पाहिजे, असे इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको विडोडो यांनी म्हटले आहे. दोन्ही देशांमधील संबंध अधिकाधिक दृढ करण्यासाठी पावले उचलावी, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

जोको विडोडो सोमवारपासून भारत दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत चर्चा करण्यास आपण उत्सुक आहोत. संरक्षण, सुरक्षा आणि दहशतवाद प्रतिबंधक क्षेत्रात भारत आणि इंडोनेशिया यांच्यात निकटचे सहकार्य हवे अशी आपली इच्छा असल्याचे ते म्हणाले.

गेल्या काही दिवसांपासून आम्ही याबाबत चर्चा करीत आहोत. दोन्ही देशांचे सागरी क्षेत्र विशाल आहे त्यामुळे या क्षेत्रातील सहकार्याचे स्वागत आहे, असे विडोडो म्हणाले. इंडोनेशिया जगात सर्वात मोठय़ा प्रमाणांत मुस्लीम लोकसंख्या असलेला देश आहे. कोणताही देश दहशतवादी हल्ल्यापासून मुक्त नसल्याने भारत आणि इंडोनेशियाने एकत्रितपणे दहशतवादाचा मुकाबला करणे योग्य ठरेल, असेही ते म्हणाले.

एससीएस युद्धभूमी बनू नये – जोको विडोडो

दक्षिण चीन सागरी क्षेत्र (एससीएस) बडय़ा देशांमधील युद्धभूमी बनू नये, असे मत इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको विडोडो यांनी व्यक्त केले आहे. हा प्रश्न शांततेने सोडविण्यासाठी संबंधित देशांसमवेत चर्चा करण्याची तयारीही विडोडो यांनी दर्शविली आहे. या वादग्रस्त क्षेत्रात युद्ध पेटले तर मोठा आर्थिक फटका बसेल, त्यामुळे हे क्षेत्र युद्धभूमी होऊ नये अशी आमची इच्छा असल्याचे विडोडो म्हणाले. जगातील सर्वात व्यस्त सागरी मार्गावर शांतता असणे महत्त्वाचे आहे, त्यामुळे सर्व वाद शांततेने सोडविण्याची गरज आहे, राजनैतिक आणि कायदेशीर प्रक्रियेचा नेहमीच आदर ठेवला पाहिजे, असेही ते म्हणाले.