अफगाणिस्तानातून अपहरण करण्यात आलेल्या ज्युडिथ डिसोझा या भारतीय महिलेची सुटका करण्यात यश आले आहे, गेले काही महिने दहशतवाद्यांनी तिला डांबून ठेवले असल्याचा संशय आहे, असे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी शनिवारी सांगितले. चाळीस वर्षे वयाची ज्युडिथ ही आगा खान फाउंडेशनमध्ये वरिष्ठ तंत्र सल्लागार म्हणून काम करीत होती. तिचे ९ जूनला काबूल येथील कार्यालयाच्या बाहेरून अपहरण करण्यात आले होते. ज्युडिथने नवी दिल्लीत पोहोचल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्वराज यांची भेट घेऊन आभार मानले.

ज्युडिथ हिची सुटका करण्यात यश आले आहे ही आनंदाची बातमी आहे, असे स्वराज यांनी ट्विटरवर म्हटले आहे. ज्युडिथची सुटका घडवण्यात अफगाणी अधिकाऱ्यांनी मोठी मदत केली आहे, त्यासाठी अफगाणिस्तानमधील त्या सर्व संबंधितांचे मी आभार मानते असे स्वराज यांनी म्हटले आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालय सतत अफगाणी अधिकाऱ्यांच्या संपर्कात होते व तिची सुटका करण्याच्या प्रयत्न सुरू होते. ज्युडिथ ही मूळची कोलकात्याची असून ती आता आमच्यासमवेत आहे व ती लवकरच भारतात पोहोचेल. ज्युडिथशी मी बोलले आहे. तिचे अपहरण कुणी केले, तिची सुटका कशी करण्यात आली हे समजू शकलेले नाही, पण दोन जणांनी तिचे अपहरण केले होते.

भारताचे राजदूत मनप्रीत व्होरा यांनीही ज्युडिथच्या सुटकेसाठी प्रयत्न केले आहेत. कोलकाता येथे ज्युडिथच्या कुटुंबीयांनी सरकारने तिच्या सुटकेसाठी केलेल्या प्रयत्नांबाबत आभार मानले आहेत. तिच्या कुटुंबीयांनी नरेंद्र मोदी यांच्याशी संपर्क साधून ज्युडिथच्या सुटकेसाठी प्रयत्न करण्यास सांगितले होते.

ज्युडिथ अफगाणी लोकांच्या कल्याणासाठी तेथे काम करीत होती. ताश्कंद येथे गेल्या महिन्यात मोदी यांची शांघाय कार्पोरेशन ऑर्गनायझेशन बैठकीच्या निमित्ताने अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी यांच्याशी भेट झाली होती तेव्हा त्यांनी ज्युडिथ हिच्या सुटकेत व्यक्तिगत लक्ष घालण्याची विनंती त्यांना केली होती.