माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरम याला सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयसमोर हजर होण्याचे निर्देश दिले आहेत. कार्तीला २३ ऑगस्ट रोजी सीबीआयसमोर हजर राहावं लागणार आहे. भ्रष्टाचार प्रकरणात कार्ती आणि इतरांविरोधात बजावलेल्या ‘लूक आऊट’ नोटिशीला मद्रास उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. या स्थगितीच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. त्यावर आपण सीबीआयसमोर हजर राहण्यास घाबरत नाही. पण मला संरक्षण द्यावे, असे कार्तीने ‘एएनआय’ला सांगितले.

कार्ती देश सोडून जाऊ शकत नाही, असे आदेश न्यायालयाने दिले होते. कार्तीला बजावलेल्या ‘लुक आऊट’ नोटिशीला स्थगिती देण्याचा निर्णय मद्रास उच्च न्यायालयाने दिला होता. या निर्णयाविरोधात सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. कार्ती याची रवानगी तुरूंगात केली जावी म्हणून आम्ही लुक आऊट नोटीस बजावली नव्हती, असे सीबीआयने न्यायालयात सांगितले होते. विदेशात जाण्याआधी कार्तीने तपास यंत्रणांना कल्पना द्यावी यासाठी ही नोटीस बजावली होती. सीबीआयची बाजू ऐकून घेतल्यानंतर कार्तीने देश सोडून जाऊ नये, असे न्यायालयाने म्हटले होते. चौकशीसाठी कधी हजर होणार हे कार्तीने १८ ऑगस्टला सांगावे, असेही न्यायालयाने सांगितले होते. कार्तीविरोधात भ्रष्टाचारप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तसेच अंमलबजावणी संचलनालयानेही (ईडी) मनी लाँड्रिंगप्रकरणी कार्ती आणि आयएनएक्स मीडियावर एफआयआर दाखल केला होती. विदेशी गुंतवणूक संवर्धन मंडळाकडून मंजुरी मिळवून विदेशी गुंतवणूक मिळवण्यासाठी कथित गैरव्यवहार केल्याचा आरोप कार्तीवर आहे.