नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी लालू प्रसाद यादव यांनी नितीश कुमार यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. ‘नितीश कुमार यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल आहे. त्यामुळे त्यांना जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. या प्रकरणात अडकू नये म्हणूनच नितीश कुमारांनी भाजपसोबत सेटिंग केली,’ असा गंभीर आरोप लालूप्रसाद यादव यांनी केला आहे.

‘नितीश कुमार यांच्यावर ३०२ आणि ३०७ कलमांतर्गत गुन्हा दाखल आहे. निवडणुकीवेळी प्रतिज्ञापत्रात त्यांनी ही माहिती दिली होती. उद्ध्वस्त झालो तरीही भाजपसोबत जाणार नाही, असे नितीश कुमार यांनी म्हटले होते. मात्र नितीश कुमार आणि नरेंद्र मोदी यांनी सेटिंग केली. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नितीश कुमार यांच्या राजीमान्यानंतर लगेच ट्विट केले आणि गेल्या काही दिवसांमध्ये नितीश कुमार यांनी कधीही भाजपचा पाठिंबा नाकारला नव्हता,’ असेदेखील लालूप्रसाद यादव यांनी म्हटले.

‘भाजपविरोधात महाआघाडी करण्याचा निर्णय एकट्या नितीश कुमार यांचा नव्हता. आम्हाला बिहारमध्ये राष्ट्रपती राजवट नको आहे. त्यामुळेच राष्ट्रीय जनता दल, संयुक्त जनता दल आणि काँग्रेसने आपला नेता निवडावा. नितीश कुमार, तेजस्वी यादव यांच्या व्यतिरिक्त एखाद्या तिसऱ्या व्यक्तीकडे राज्याचे मुख्यमंत्रीपद देण्यात यावे,’ असेही लालू प्रसाद यादव यांनी म्हटले.