लालूप्रसाद यादव यांच्या अडचणींमध्ये वाढ होतानाच दिसते आहे, कारण आयकर विभागाने राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यांच्या मुलांची बेहिशेबी संपत्ती आयकर विभागाने जप्त केली आहे. यासंदर्भातले आदेश आयकर विभागाने सोमवारी काढले आहेत. तसेच राज्यसभेची खासदार आणि लालूप्रसाद यादव यांची मुलगी मीसा भारतीला बेनामी जमिनीसंदर्भात स्पष्टीकरणही मागितले आहे. जुलै महिन्यात आयकर विभागाच्या कार्यालयात हजर होऊन यासंदर्भातले स्पष्टीकरण द्यावे असेही आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे लालूप्रसाद यादव यांच्या मुलांच्या अडचणींमध्ये भर पडली आहे. याआधी ५० कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली. आता ९० दिवसात बेहिशेबी संपत्ती संदर्भात स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे.

लालूप्रसाद यादव यांची मुलगी मीसा भारती आणि तिचा पती शैलेश कुमार यांना आयकर विभागाने स्पष्टीकरण देण्यासाठी आयकर कार्यालयात हजर राहण्याचे समन्स बजावले होते. ६ जून रोजी हे दोघेही हजर झाले नाहीत, त्यामुळे त्यांना १० हजारांचा दंडही ठोठावण्यात आला. तर २३ मे रोजी आयकर विभागाने लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या नातेवाईकांशी संबंधित असलेल्या २२ ठिकाणी छापे मारले होते. लालूप्रसाद यादव यांनी या गोष्टीचा इन्कार केला होता. १२ जून रोजी लालूप्रसाद यादव यांनी आपला ७० वा वाढदिवस साजरा केला. त्यावेळी माझ्या आणि माझ्या कुटुंबांशी संबंधित लोकांवर टाकण्यात आलेले छापे राजकीय हेतूने प्रेरित असल्याची टीका लालूप्रसाद यादव यांनी केली होती. तसेच सीबीआयसारख्या तपास यंत्रणांचा वापर राजकीय स्वार्थासाठई होत असल्याचेही त्यांनी म्हटले होते.

दोन दिवसांपूर्वीच लालूप्रसाद यादव यांचा मुलगा तेजप्रसाद यादव याला देण्यात आलेला पेट्रोलपंपाचा परवानाही रद्द करण्यात आला होता. तुम्हाला पेट्रोल पंपचा परवाना कसा मिळाला, असा प्रश्न बीपीसीएलने तेजप्रताप यांना विचारला होता. तेजप्रताप यांनी या नोटिशीला उत्तर दिले नव्हते. त्यानंतर हा परवाना रद्द करण्यात आला. २०११ मध्ये पेट्रोल पंपचा परवाना मिळवण्यासाठी तेजप्रताप यादव यांनी तेल कंपनीच्या अधिकाऱ्यांबरोबर मिलीभगत करून बनावट कागदपत्रे बनवली होती, असा आरोप बिहार भाजपचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी केला होता. त्यानंतर हा परवाना रद्द करण्यात आला होता. आता आयकर विभागाने मुलांची बेहिशेबी संपत्तीही जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.