कायदा पाळायचा नसेल आणि ज्यांना कायद्याची भीती वाटत नसेल तर त्यांनी खुशाल उत्तर प्रदेश सोडून जावे, असा इशारा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिला आहे. गोरखपूरमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी व्हीआयपी संस्कृती संपुष्टात आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्री, राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांच्या वाहनांवरील लाल दिवे हटवण्याच्या घेतलेल्या निर्णयाचेही कौतुक केले. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कटिबद्ध आहोत, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

 

बालेकिल्ला असलेल्या गोरखपूरमध्ये झालेल्या कार्यक्रमात भाषण करताना सुरुवातीलाच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्णयांचे कौतुक केले. मोदींनी व्हीआयपी संस्कृती संपुष्टात आणण्यासाठी मंत्री आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या वाहनांवरील लाल दिवे हटवण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे कौतुक केले. मोदींच्या निर्णयानुसार उत्तर प्रदेशातील व्हीआयपी संस्कृतीही संपुष्टात आणणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी गोरक्षणाच्या नावाखाली गुंडगिरी करणाऱ्यांनाही इशारा दिला.

गोवंश हत्याबंदीच्या मु्द्द्यावर देशातले वातावरण तापलेले आहे. अनेक स्वयंघोषित गोरक्षकांच्या झुंडीच्या झुंडी देशामध्ये अनेक ठिकाणी रस्त्यारस्त्यांवर दादागिरी करत आहेत. या स्वयंघोषित गोरक्षकांनाही त्यांनी गोरक्षणाच्या नावाखाली धुडगूस घालू नये, असा इशारा दिला. विशेष म्हणजे योगी आदित्यनाथ यांनी गायींचे संरक्षण हा त्यांच्या राजवटीचा प्रमुख मुददा बनवत राज्यातील अवैध कत्तलखान्यांवर बंदी घातली होती. यावेळी दिल्ली महापालिकांच्या निवडणुकांत दारूण पराभव झालेल्या आम आदमी पक्षाचे निमंत्रक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरही निशाणा साधला. ईव्हीएम म्हणजे ‘एव्हरी व्होट मोदी’ असे सांगून त्यांनी केजरीवाल यांना टोला लगावला.