हिंदूत्व म्हणजे विविधतेत एकता असून या एकतेच्या माध्यमातून राष्ट्र पुढे जाऊ शकते, असे विधान सरसंघचालक मोहन भागवत यांनी शुक्रवारी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या विश्व हिंदू काँग्रेसच्या कार्यक्रमात केले.
भारतात हिंदूंचे अस्तित्व सर्वात पूरातन असून हिंदूत्वातूनच नेहमी नवीन मार्ग निघत आला आहे आणि यापुढेही निघेल याचा विश्वास असल्याचेही ते म्हणाले. संपूर्ण जगातील हिंदूंनी एकत्र येऊन आपल्या समाजाला बळकट करणे आणि राष्ट्राला पुढे घेऊन जाणे यासंबंधी विचार मांडण्याचे विश्व हिंदू काँग्रेस हे एक उत्तम व्यासपीठ असल्याचे मोहन भागवत यावेळी म्हणाले. एक हिंदू समाज म्हणून आपण एकत्र प्रयत्न करू असे आवाहन देखील भागवत यांनी यावेळी केले. तसेच भागवत यांनी हिंदूत्वाच्या प्रभाविकतेचे अनेक दाखले देखील आपल्या भाषणातून यावेळी दिले. दरम्यान, दिल्लीत सुरु असलेल्या या विश्व हिंदू काँग्रेसच्या कार्यक्रमाला तब्बल ४० देशांचे १,५०० हून अधिक प्रतिनिधी उपस्थित राहणार असून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, नितीन गडकरी आणि निर्मला सीतारामण देखील उपस्थितांना संबोधित करणार आहेत. यामध्ये अर्थव्यवस्था, राजकारण, शिक्षण, महिला आणि माध्यमे या विषयांवर चर्चासत्रे आयोजित करण्यात आली आहेत.