झारखंड विधानसभेच्या मंगळवारी झालेल्या मतमोजणीचा कल पूर्णपणे भाजपच्या बाजूने लागला आहे. भाजपने मतमोजणीत बहुमताचा आकडा गाठला असल्याने झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार बनणार असल्याचे निश्चित झाले आहे.  झारखंड विधानसभेच्या जाहीर झालेल्या निकालांवरून मोदीनामाचा करिश्मा अद्यापपर्यंत टिकून असल्याचे दिसून आले. झारखंड विधानसभेच्या ८१ जागांसाठी भाजप, काँग्रेस, झारखंड मुक्ती मोर्चा(झामुमो) आणि झारखंड विकास मोर्चा (झाविमो) या प्रमुख राजकीय पक्षांमध्ये लढत रंगली होती. यामध्ये भाजपच्या खात्यात ४२ जागा, झामुमो १९, काँग्रेस ६, झाविमो ८ आणि अन्य पक्षांना सहा  जागांवर विजय प्राप्त करता आला. मागील विधानसभा निवडणुकांमध्ये या ठिकाणी भाजपला १८, काँग्रेस १४, झामुमो १८, झाविमो ११ तर अपक्षांना पाच जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे झारखंडमध्ये यावेळी भाजपने मुसंडी मारत इतर पक्षांचा सुपडासाफ केल्याचे चित्र आहे. यामध्ये झामुमोच्या उमेदवाराकडून माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांचा पराभवाला सामोरे जावे लागले.