महिलांवरील अत्याचारांच्या दिवसेंदिवस वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केवळ महिलांना सक्षम करणारे कायदे करणे पुरेसे नाही, त्यांची योग्य ती अंमलबजावणी करणे महत्वाचे असल्याचे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी म्हटले आहे. त्या महिलांवरील अत्याचाराविरोधात जनजागृती करण्यासाठीच्या ‘अहिंसा संदेश योजना’ कार्यक्रमात बोलत होत्या.
सोनिया गांधी कार्यक्रमा दरम्यान म्हणाल्या, देशामध्ये महिलांना सुरक्षित आणि त्यांच्या विकासासाठी योग्य असे वातावरण निर्माण करणे, त्यांना सन्मान देणे यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. केवळ कायदे करून आणि धोरणे आखून महिलांची प्रगती होणार नाही. त्यांची योग्य पद्धतीन अंमलबजावणीही झाली पाहिजे असेही त्यांनी स्पष्ट केले. महिलांबद्दलची समाजाची सध्याची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. आजही स्त्री-पुरुष समानतेचे आव्हान भारतासमोर आहे. मुलींनाही शिक्षणाचा, प्रगतीचा आणि रोजगार मिळण्याचा अधिकार आहे. त्यामुळे महिलांच्या सबलीकरणासाठी सामाजिक आंदोलनेही झाली पाहिजेत  असेही सोनिया म्हणाल्या.