आपल्या नेत्यांबाबत कठोर मत प्रदर्शन करण्याचे चीनचे नेते नेहमीच टाळतात. मात्र खुद्द राष्ट्रपतींशी जिनपिंग यांनी गुरुवारी देशाचे महान नेते माओ झेडाँग यांनीही चुका केल्याचे खळबळजनक विधान केले. माओंनी चुका केल्या असल्या तरी चीनच्या जनतेने देशाचा चेहरामोहरा बदलून टाकणाऱ्या या आपल्या महान नेत्याच्या भूमिका समजून घेऊन इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोण योग्य ठेवावा, असेही म्हटले आहे.
माओ यांनी अनेक राजकीय आणि आर्थिकदृष्टय़ा अनेक विवादास्पद निर्णय घेतले. त्याचा मोठा फटका चीनला बसला. त्यामुळे त्यांची गणना चीनच्या इतिहासातील वादग्रस्त नेत्यांमध्ये केली जाते. मात्र असे असले तरी चिनी नागरिकांच्या मनात त्यांच्याबद्दल आदराचे स्थान आहे.
देशाच्या या महान नेत्याच्या १२० व्या जन्म दिनाच्या पाश्र्वभूमीवर एका परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी झिनपिंग बोलत होते. ते पुढे म्हणाले की, माओ हे देशाचे महान नेते असून त्यांनी देशाचा चेहरा बदलला. त्यामुळे चीनच्या या नेत्याकडे बघताना नागरिकांनी इतिहास समजून घेऊन सकारात्मक दृष्टिकोण बाळगावा. क्रांतिकारी नेते हे देव नाहीत. तेसुद्धा मनुष्यप्राणी आहेत. त्यामुळे आपण देवाप्रमाणे त्यांची पूजा करणे योग्य नाही. तसेच त्यांच्या चुकांकडे कानाडोळा न करता त्या दुरुस्त करून स्वीकारायला पाहिजेत. त्यांनी चुका केल्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे वा त्यांच्या ऐतिहासिक कामगिरीकडे कानाडोळा करणे योग्य नाही, असेही झिनपिंग यांनी म्हटल्याचे क्झिनुआ या सरकारी वृत्तसंस्थेने स्पष्ट केले.