उपराष्ट्रपती हमीद अन्सारी हे मोरोक्कोतील मोहम्मद व्ही. विद्यापीठात व्याख्यान देण्यासाठी आले असता तेथे एका पोस्टरवर पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशचा समावेश असलेला ब्रिटिशांच्या काळातील भारताचा नकाशा दाखविण्यात आल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सदर पोस्टरमध्ये भारताच्या अशा प्रकारच्या नकाशासह उपराष्ट्रपतींचेही छायाचित्र झळकले आहे. विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावरच हे पोस्टर लावण्यात आले आहे. एकूण तीन ठिकाणी अशा प्रकारचे नकाशे लावण्यात आले होते, मात्र भारतीय अधिकाऱ्यांनी त्याबाबत हस्तक्षेप केल्यानंतर दोन नकाशे झाकण्यात आले, असे कळते.
दरम्यान, भारतीय मुस्लिमांचा हिंसक विचारसरणीकडे झुकण्याचा कल नाही, असे उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी बुधवारी येथे स्पष्ट केले. वैविध्यतेचा स्वीकार करण्यासाठी भारताने जे प्रयत्न केले आहेत त्याकडे मोरोक्कोतील विद्वानांनी एक दृष्टिक्षेप टाकावा, असेही अन्सारी म्हणाले.
भारतीय मुस्लिमांना घटनेने दिलेले हक्क मिळत आहेत, त्यांचा नागरी प्रक्रियेत सहभाग आहे, त्यामुळे भारतातील मुस्लिमांचा हिंसक विचारसरणीकडे झुकण्याचा कोणताही कल नाही, असेही अन्सारी म्हणाले. येथील मोहम्मद व्ही विद्यापीठात व्याख्यान देताना उपराष्ट्रपती बोलत होते. भारतीय मुस्लीम हजारो वर्षांपासून समाजात राहात आहेत, त्याचा ठसा आधुनिक भारतावर पडला आहे, असेही ते म्हणाले.
चेंबर ऑफ कॉमर्स
भारत आणि मोरोक्को यांच्यातील व्यापाराला चालना देण्यासाठी दोन्ही देशांनी चेंबर ऑफ कॉमर्स सुरू केले आहे. हमीद अन्सारी आणि मोरोक्कोचे पंतप्रधान अब्देलीलाह बेनकिरान यांनी मंगळवारी येथे एका कार्यक्रमात इंडिया-मोरोक्को चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीचे उद्घाटन केले. आपण सर्व बाबी गृहीत धरल्याने चेंबर ऑफ कॉमर्स आतापर्यंत अस्तित्वात नव्हते, असे अन्सारी या वेळी म्हणाले.