ट्विटरने नवी ‘लघु ध्वनिचित्रफित सेवा’ सुरु करून २४ तासही उलटण्याच्या आत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी एनसीसीच्या कार्यक्रमातील त्यांच्या भाषणाची चित्रफित तेथे प्रक्षेपित करीत तंत्रज्ञानावरील आपल्या प्रेमाची प्रचीती दिली. मोदींच्या ‘विविधतेत एकता’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारीत असलेली ही लघु ध्वनिचित्रफित ७०० जणांपेक्षा अधिक जणांनी रिट्विट केली. जगभरातील राजकीय नेत्यांमध्ये नरेंद्र मोदी हे सर्वाधिक ‘फॉलो’ केले जाणारे नेते आहेत. ट्विटरवर त्यांचे ९० लाखांपेक्षा अधिक फॉलॉअर्स आहेत. सर्वाधिक लोकप्रिय ट्विटर खात्यांच्या बाबतीत अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्यानंतर पंतप्रधान मोदी यांचा नंबर लागतो.