रामनाथ कोविंद यांनी मीरा कुमार यांना हरवत देशाच्या राष्ट्रपतीपदी बसण्याचा बहुमान मिळवला आहे. रामनाथ कोविंद यांना एकूण मतांच्या ६५ टक्के मतं मिळाली तर मीरा कुमार यांना ३४ टक्के मतं मिळाली आहेत. एनडीएकडे असलेलं मताधिक्य लक्षात घेता रामनाथ कोविंद यांचा विजय होणार हे निश्चित मानलं जात होतं. अपेक्षेप्रमाणे त्यांचाच विजय झाला आहे.

‘मला विजयी केल्याबद्दल मी सगळ्याच जनतेचे आभार मानतो. मी राष्ट्रपती होईन असं कधीही वाटलं नव्हतं’ अशी प्रतिक्रिया रामनाथ कोविंद यांनी दिली आहे, आज जनतेसमोर बोलताना ते चांगलेच भावूक झाले होते. त्यांच्या विजयानं भाजपच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे. सगळ्याच नेत्यांनी कोविंद यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सगळ्याच मतदारांचे आभार मानून रामनाथ कोविंद यांचं अभिनंदन केलं आहे.

रामनाथ कोविंद यांचा शपथविधी २५ जुलै रोजी होणार आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही वर्षांपूर्वीचा एक फोटो ट्विट करून रामनाथ कोविंद यांचे आभार मानले आहेत.

देशाच्या राष्ट्रपतीपदी त्यांची निवड झाली ही अत्यंत चांगली बाब आहे असं ट्विट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे. रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपतीपदी निवड झाल्यानं देशातल्या ग्रामिण जनतेचा आणि दलितांचा सन्मान झाला आहे असंही योगी आदित्यनाथ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. तर रामनाथ कोविंद यांच्या प्रतिस्पर्धी मीरा कुमार यांनीही रामनाथ कोविंद यांचं अभिनंदन करत त्यांच्या विजयाचं ट्विटरवरून कौतुक केलं आहे.

रामनाथ कोविंद यांची उमेदवारी जाहीर होताच त्यांचा विजय निश्चित झाला होता. अपेक्षेप्रमाणे त्यांचा विजय झाला आहेत. आता लवकरच त्यांचा शपथविधी होणार आहे.