पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भावना; टीकाकारांनाही प्रत्युत्तर

‘‘दोन वर्षांपूर्वी ‘मन की बात’ या कार्यक्रमाला सुरूवात करताना त्याकडे राजकीय दृष्टीकोनातून पाहिले जाईल असे वाटले नव्हते’’ अशा शब्दांत या कार्यक्रमाच्या टीकाकारांना उत्तर देतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमाद्वारे देशातील प्रत्येक कुटुंबाचा सदस्यच बनल्यासारखे वाटते, अशी भावना रविवारी व्यक्त केली. केंद्रातील भाजप सरकारच्या तीन वर्षेपूर्तीनंतरच्या पहिल्याच ‘मन की बात’ कार्यक्रमात मोदी यांनी विविध विषयांना स्पर्श करत विरोधकांना लक्ष्य केले.

पंतप्रधानांना जे हवे आहे तेच ते बोलतात आणि जनसामान्यांचा आवाज ते ऐकत नाहीत, अशी टीका विरोधकांनी केली आहे. मोदी यांनी त्यास रविवारी उत्तर दिले. ‘‘२ ऑक्टोबर २०१४ रोजी ‘मन की बात’ या मासिक कार्यक्रमाला सुरूवात केली. सामान्य माणसाप्रमाणे बऱ्यावाईट गोष्टींचा प्रभाव माझ्यावरही पडतो. काहीजण ‘मन की बात’ स्वगत म्हणून ऐकतात तर काहीजण टीका करतात. पण या कार्यक्रमाद्वारे घरी बसून मी माझ्या कुटुंबासोबत संवाद साधत असल्यासारखे वाटत’’, असे मोदी म्हणाले. अगदी अशाच भावना अनेक कुटुंबांनी आपल्याला पत्राद्वारे कळवल्या, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

दोन दिवसांपूर्वी ‘मन की बात’ या कार्यक्रमाचे विश्लेषण करणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते व उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या उपस्थितीत झाले, याचा संदर्भही मोदी यांनी या वेळी दिला. या पुस्तकात ‘मन की बात’ कार्यक्रमातील विषयांवर आधारित चित्रे अबु धाबीच्या अकबर नावाच्या कलाकाराने एक पैसाही न घेता काढून दिली, असे सांगत मोदी यांनी त्याचे कौतुक केले.

मोदी यांनी या वेळी पर्यावरण संरक्षण, स्वच्छता व कचरा व्यवस्थापन, योगा आणि स्वातंत्र्यसैनिक या मुद्यांवरही भर दिला. राज्य सरकार आणि लोकप्रतिनिधींच्या मदतीने केंद्र सरकार ५ जून रोजीच्या

जागतिक पर्यावरणदिनापासून कचरा व्यवस्थापनासाठी मोहीम

  • सुरू करणार आहे. किमान चार हजार शहरांत ओला आणि सुका कचरा गोळा करण्याची मोहीम हाती घेण्यात येणार आहे, असे मोदी म्हणाले.
  • २१ जूनच्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय योगा दिनाकडे लक्ष वेधत मोदी यांनी ‘सेल्फी विद डॉटर’ या धर्तीवर एकाच कुटुंबातील तीन पिढयांचे म्हणजे आजी-आजोबा, आई-वडील आणि मुले यांचे सेल्फी काढून मला पाठवा, असे आवाहन केले.
  • स्वातंत्र्यासाठी शूरवीरांनी प्रचंड यातना भोगल्या. म्हणूनच आज आपण स्वतंत्र भारतात मुक्तपणे श्वास घेत आहोत, असे सांगत मोदी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीचा उल्लेख केला. अंदमान-निकोबार बेटांवरील सेल्युलर जेलला तरुण पिढीने भेट द्यायला हवी. आपण तेथे भेट दिली तरच त्याला ‘काळे पाणी’ का म्हणतात याची कल्पना येईल, असे मोदी म्हणाले.

अफरोज शाहचे कौतुक

  • मुंबईतील वर्सोवा किनाऱ्यावर स्वच्छता मोहीमेसाठी पुढाकार घेणाऱ्या अफरोज शाह याचे मोदी यांनी कौतुक केले. अफरोज आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वर्सोवा किनाऱ्यावर सुमारे २.७ किलोमीटरच्या पट्टयात स्वच्छता मोहीम राबवली. त्यासाठी अफरोज आणि त्याच्या सहकाऱ्यांचे मोदी यांनी अभिनंदन केले.

रमजानच्या शुभेच्छा

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वेळी देशवासीयांना आजपासून सुरू झालेल्या रमजानच्या शुभेच्छा दिल्या. विविध धर्म, पंथांचे लोक राहत असल्याचा अभिमान बाळगणाऱ्या या देशात या सणाद्वारे सामाजिक सौहार्द आणि शांततेला चालना मिळो, अशी प्रार्थनाही मोदी यांनी केली.