‘नासा’चे मेसेंजर अंतराळयान बुध ग्रहावर आदळल्यामुळे या ग्रहाची महत्त्वाची माहिती आणि हजारो प्रतिमा पुरवणाऱ्या या मोहिमेची अखेर झाली आहे.
‘मक्र्युरी सरफेस, स्पेस एन्व्हायर्नमेंट, जिओकेमिस्ट्री अँड रेंजिंग’ (मेसेंजर) हे अंतराळयान आधी वर्तवलेल्या अंदाजानुसार गुरुवारी बुधाच्या पृष्ठभागावर आदळले, याला मेरिलँडमधील जॉन्स हॉपकिन्स अप्लाइड फिजिक्स लॅबोरेटरीतील (एपीएल) या मोहिमेच्या नियंत्रकांनी सांगितले.
३ ऑगस्ट २००४ रोजी अवकाशात सोडण्यात आलेल्या मेसेंजर अंतराळयानाने १८ मार्च २०११ पासून बुध ग्रहाच्या कक्षेत परिभ्रमण करण्यास सुरुवात केली. ज्या प्राथमिक वैज्ञानिक उद्देशांसाठी हे अंतराळयान पाठवण्यात आले होते, ती त्याने मार्च २०११ मध्ये पूर्ण केली.
मेसेंजरच्या सुरुवातीच्या शोधांमुळे अनेक महत्त्वाचे नवे प्रश्न उद्भवल्यामुळे, तसेच यानाचे ‘पेलोड’ व्यवस्थित असल्यामुळे या मोहिमेची मुदत दोन वेळा वाढवण्यात आली. यामुळे या अंतराळयानाला अतिशय कमी उंचीवरून निरीक्षणे नोंदवणे, तसेच अभूतपूर्व सविस्तर रीतीने बुध ग्रहाच्या प्रतिमा व माहिती टिपणे शक्य झाले.
गेल्या महिन्यात या मोहिमेला अखेरची अल्पकालीन मुदतवाढ देण्यात आली. २८ एप्रिल रोजी वैज्ञानिकांच्या चमूने कक्षसुधारणेच्या सातपैकी अखेरचा प्रयत्न यशस्वीरीत्या पूर्ण केला. मात्र त्यानंतर यानाची उंची वाढवण्याचा काहीच मार्ग नसल्याने, सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याच्या कक्षेत निर्माण झालेल्या अडथळ्यांना प्रतिबंध करण्यात ते अपयशी ठरले. परिणामी हे अंतराळयान ताशी ८७५० मैलांच्या गतीने बुधाच्या पृष्ठभागावर आदळले व यामुळे या ग्रहावर ५२ फूट रुंदीचे नवे विवर निर्माण झाले.
‘आमच्या शेजारी ग्रहांचे अन्वेषण करणाऱ्या आमच्या सर्वाधिक लवचीक व कुशल अंतराळयानांपैकी एका यानाला आम्ही आज अभिमानाने निरोप दिला’, असे मेसेंजरचे मुख्य संशोधक आणि कोलंबिया विद्यापीठाच्या लॅमाँट-डोहेर्टी भू-वेधशाळेचे संचालक सीन सोलोमन यांनी सांगितले.