देवीच्या सृजनशीलतेचे प्रतीक म्हणून अनेक देवी कमलासनावर बसलेल्या दिसतात. वृषभ हे वाहनही सृजनाशी संबंध दर्शविते. शिवाची शक्ती, शैलपुत्री, पार्वती, माहेश्वरी या वृषभारूढ देवी आहेत. वृषभ हे पौरुषत्वाचे प्रतीक मानले जाते. अत्यंत प्राचीन काळापासून शृंग धारण करणारे शक्तिशाली पशु, हे उत्पादक देव मानले गेले आहेत. शाक्तमतानुसार सृजनाची ही शक्ती स्त्रीरूपात असल्याने वृषभ हे या शक्तीचे वाहन बनले. शक्तीच्या राजस गुणांचे मूर्तिमंत प्रतीक असणारी लक्ष्मी ही देवी सदैव पद्मासानस्थ असते.

सुवर्ण-रजताचे अलंकार धारण करणारी, मौल्यवान वस्त्रप्रावरणे परिधान केलेली लक्ष्मीची मूर्ती पूर्वीपासून राजवैभवाचे चिन्ह असल्यामुळे, ‘गज’ या प्राण्याशी तिचा घनिष्ठ संबंध आहे. गज हे तिचे वाहन नसले तरी लक्ष्मीच्या दोन्ही बाजूला तिच्यावर जलाभिषेक करणाऱ्या गजांची शिल्पे सुप्रसिद्ध आहेत. श्रीसूक्तात वर्णन केलेली ‘हस्तिनादप्रबोधिनी’ लक्ष्मी ही श्रीदेवी आणि भूदेवी अशा दोन्ही रूपाने समृद्धीची द्योतक आहे. म्हणूनच राजवैभव आणि मेघवर्षांव सूचित करणारे हत्ती लक्ष्मीच्या बाजूला सतत पाहायला मिळतात.

अत्यंत चंचल म्हणून जिचे वर्णन विष्णूपुराणासारख्या ग्रंथातून येत असले तरी स्थर्याचे, स्तिथप्रज्ञतेचे प्रतीक असणारे घुबड (उलूक) हे लक्ष्मीचे वाहन मानले जाते. कदाचित लक्ष्मीची चंचलता अधोरेखित करण्यासाठी दिवाभीत तिचे वाहन झाला असावा. श्रीसूक्तामध्ये म्हणूनच लक्ष्मीला ‘पिगला’ असे विशेषण वापरले आहे. घुबड हे अमंगलाचे सुद्धा प्रतीक समजले जाते. अमंगलाचा नाश करून मांगल्य आणि समृद्धी प्रदान करणारी लक्ष्मी आल्याने घुबड हे तिचे वाहन योजले असावे.

डॉ. सीमा सोनटक्के – response.lokprabha@expressindia.com

सौजन्य – लोकप्रभा