माध्यमांकडे माहिती फोडल्याचा ठपका

सुरक्षाविषयक उच्चस्तरीय बैठकीत नागरी आणि लष्करी अधिकाऱ्यांमधील मतभेद विकोपाला गेल्याचे वृत्त माध्यमांकडे फोडल्याचे चौकशीत सिद्ध झाल्याने पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी आपले निकटचे सहकारी आणि परराष्ट्रविषयक विशेष साहाय्यक तारिक फातेमी यांची पदावरून हकालपट्टी केली आहे.

फातेमी यांना परराष्ट्रविषयक विशेष साहाय्यक पदावरून हटविण्याची चौकशी समितीने केलेली शिफारस नवाझ शरीफ यांनी मान्य केली. फातेमी हे शरीफ यांचे अत्यंत विश्वासू सहकारी होते, त्यांची हकालपट्टी करण्यात आल्याने शरीफ सरकारला चांगलाच धक्का बसला आहे. पनामा पेपर्स प्रकरणावरून शरीफ हे आधीच अडचणीत सापडले आहेत.

न्या. (निवृत्त) आमिर रझा खान यांच्या अध्यक्षतेखालील समितीमध्ये गुप्तचर ब्युरो, लष्करी गुप्तचर यंत्रणा आणि आयएसआयच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. देशाच्या सुरक्षेसंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीतील घडामोडींचा वादग्रस्त अहवाल ‘डॉन’ने दिल्यानंतर गेल्या वर्षी ही समिती स्थापन करण्यात आली होती. नागरी आणि लष्करी अधिकाऱ्यांमधील मतभेद विकोपाला गेले असल्याचे वृत्त ऑक्टोबर महिन्यात ‘डॉन’ने प्रसिद्ध केले होते.