अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी हिलरी क्लिंटन याच योग्य आहेत, असे म्हणत हिलरी क्लिंटन यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी पाठिंबा दर्शवला आहे. फिलाडेल्फिया येथे डेमोक्रॅटिक पार्टीच्या कन्व्हेन्शनमध्ये ते बोलत होते. डेमोक्रॅटिक पार्टीचा कट्टर विरोधक असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांना हरवण्यासाठी आणि अमेरिकचा नवा इतिहास रचण्यासाठी आपण हिलरी यांना पूर्ण मदत करू, कारण आतापर्यंत माझ्या आणि बिल क्लिटंनपेक्षाही हिलरीच या देशाचे भविष्य घडवण्यासाठी योग्य असल्याची स्तुती त्यांनी केली. हिलरी यांना कोणीही कितीही खाली खेचण्याचा प्रयत्न केला तरी त्या कधीच हार मानणा-यांपैकी नाहीत. हिलरींची ही ताकद मी ओळखून आहे असेही बराक ओबामा म्हणाले. २००८ च्या अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत हिलरी या ओबामांच्या प्रतिस्पर्धी होत्या. त्यानंतर ओबामांनी हिलरी यांची परराष्ट्रमंत्री म्हणून नेमणूक केली होती. या भाषणात दहशतवादी ओसामा बीन लादेनला मारण्याच्या मोहीमेच्या वेळी हिलरी यांनी कशी साथ दिली याचाही उल्लेख त्यांनी केला.
हिलरी यांना उमेदवारी मिळवून नवा इतिहास रचला यासाठी ओबांमानी त्याचे विशेष कौतुक केले. याच वेळी त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरही निशाणा साधला. माहिला आणि पुरूष यांच्या ताकदीने एकसंघ असलेले अमेरिकी सैन्य जगातील सगळ्यात बलशाली सैन्य आहेत हे डोनाल्ड ट्रम्प विसरले आहेत. या देशाची ताकद ही डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अवलंबून नाही असा टोलाही त्यांनी ट्रम्प यांना लगावला. ‘येस ही विल’ हा अमेरिकाचा नारा नसून ‘येस वुई कॅन’ हा अमेरिकेचा खरा नारा आहे, असे त्यांनी अमेरिकन जनतेला उद्देशून म्हटले. १२ वर्षांपूर्वी याच दिवशी मी कन्व्हेन्शमध्ये अमेरिकेला उद्देशून बोलत होतो, पण आजच्या घडीला मला अमेरिकेचे भविष्य जास्त आशादायी वाटते आहे. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये होणारी राष्ट्राध्यपदाची लढत ही रिपब्लिकन विरुद्ध डेमोक्रॅटिक अशी नसून ती द्वेष विरुद्ध आशावाद, अशी आहे असेही ते म्हणाले.