अमेरिकेने क्षेपणास्त्र चाचणी फसल्याची माहिती दिली

अमेरिकेच्या इशाऱ्यांना भीक न घालता उत्तर कोरियाने आंतरखंडीय क्षेपणास्त्राची चाचणी करण्याचा प्रयत्न केला पण ती फसली. अमेरिकेने ही क्षेपणास्त्र चाचणी फसल्याची माहिती दिली आहे. ही चाचणी अपयशी ठरली असली तरी त्यामुळे कोरियन द्वीपकल्पातील तणाव आणखी वाढत जाणार आहे. अमेरिकेच्या पॅसिफिक कमांडने केलेल्या निरीक्षणानुसार हवाई येथील वेळेनुसार सकाळी १०.३३ वाजता उत्तर कोरियाने क्षेपणास्त्राची चाचणी केली. आंतरखंडीय क्षेपणास्त्र पुकचांग हवाई क्षेत्रातून सोडण्यात आले असे अमेरिकेच्या पॅसिफिक कमांडने म्हटले आहे. हे क्षेपणास्त्र उत्तर कोरियाचा प्रदेश सोडू शकले नाही, असे या कमांडचे प्रवक्ते डेव्ह बेनहॅम यांनी सांगितले. या घटनेबाबत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियाच्या प्रक्षोभक कृतीबाबत संताप व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले आहे, की उत्तर कोरियाने चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी केलेले आवाहन झुगारून ही चाचणी केली, त्यामुळे त्यांचाच अवमान झाला आहे.

थेट संवादाची अमेरिकेची तयारी– टिलरसन

वॉशिंग्टन – अण्वस्त्र प्रश्नावर उत्तर कोरियाशी अमेरिका थेट बोलणी सुरू करू शकते, असे संकेत परराष्ट्रमंत्री रेक्स टिलरसन यांनी दिले आहेत. नॅशनल पब्लिक रेडिओला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले, की संवादाच्या मार्गातून हा प्रश्न सोडवता येईल. अमेरिकेने याआधी मात्र उत्तर कोरियाला वठणीवर आणण्यासाठी लष्करी कारवाईशिवाय पर्याय नाही असे म्हटले होते. आता त्या भूमिकेत थोडी नरमाई येत असल्याचे सूचित होत आहे.