जनतेचे आयुष्य सुखी-समाधानी करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू, जनतेला सोयी-सुविधा देऊ वगैरे छापाची अनेक वाक्ये आपण आजपर्यंत वेगवेगळ्या राज्यकर्त्यांकडून ऐकली असतील. मात्र, संयुक्त अरब अमिरातीच्या (युएई) राज्यकर्त्यांकडून जनतेच्या आनंदाची काळजी घेण्यासाठी विशेष मंत्रीपदच तयार करण्यात आले आहे. युएईचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन रशिद अल मक्तुम यांनी सोमवारी ट्विटरवरून यासंबंधीची घोषणा केली. समाजात चांगले आणि समाधानी वातावरण निर्माण व्हावे यासाठी आनंद राज्यमंत्री हे पद निर्माण केले जात असल्याचे त्यांनी म्हटले. याशिवाय, देशातील सहिष्णुतेवर लक्ष ठेवण्यासाठीही राज्यमंत्रीपद निर्माण करण्यात आले आहे.