राजकीय लाभासाठी काळ्या पैशाच्या मुद्दय़ावर निवडणुकीपूर्वी आश्वासने देऊन सत्ताधारी भाजपने जनतेची दिशाभूल केली आहे. त्यामुळे त्यांनी माफी मागावी अशी मागणी काँग्रेसने संसदेत केली.
लोकसभेत या मुद्दय़ावर चर्चेला सुरुवात करताना काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी निवडणूक प्रचारात नरेंद्र मोदी यांनी जनभावनेशी खेळ केल्याचा आरोप केला. देशाबाहेरील काळा पैसा मायदेशी आल्यावर प्रत्येकाला १५ लाख रुपये मिळतील असे आश्वासन प्रचारात दिले. आता तुम्ही सत्तेत आहात मात्र आश्वासनाचे काय?  असा सवाल खरगे यांनी विचारला. विरोधकांनी संसदेत काळ्या पैशाचा मुद्दा लावून धरल्याने अखेर नियम १९३ अन्वये चर्चा घेण्यात आली. इतर देशांशी झालेल्या करारांकडे बोट दाखवत सरकार काळा पैसा असलेल्यांची नावे जाहीर करण्यात सर्वोच्च न्यायालयात नकार देते. त्यामुळे सरकारने १२५ कोटी जनतेची दिशाभूल केली असा आरोप खरगे यांनी केला. भाजपचे नेते काळ्या पैशांचे वेगवेगळे आकडे सांगत आहेत. मात्र जनतेमध्ये जबाबदारीने बोला असा सल्ला खरगे यांनी दिला.
भाजपच्या अनुराग ठाकूर यांनी सरकारच्या बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. भाजप सरकार सत्तेत येताच मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत सरकारने या मुद्दय़ावर विशेष चौकशी पथक स्थापन केल्याचे ठाकूर यांनी सांगितले. आमच्याच सरकारने एचएसबीसी बँकेमध्ये अशा व्यक्तींची खाती असलेली नावे विशेष चौकशी पथकाकडे दिल्याचे स्पष्ट केले. जागतिक व्यासपीठावर हा मुद्दा पहिल्यांदा मोदींनी उपस्थित केल्याचे ठाकूर यांनी स्पष्ट केले. ज्यांच्याकडे काळा पैसा आहे अशाच व्यक्ती सभागृहात असल्याचा टोला ठाकूर यांनी तृणमूल काँग्रेसला लगावला.
राज्यसभेतही टीका
राज्यसभेत काँग्रेसच्या आनंद शर्मा यांनी नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले. प्रचारात हा मुद्दा मांडणाऱ्या मोदींनी आता भूमिका बदलल्याचा आरोप केला, तसेच काळ्या पैशावरून सत्ताधारी गंभीर नसल्याची टीका त्यांनी केली.