देशाच्या राजकारणाला नव्या दिशेने नेणाऱया वळणावर आपण उभे आहोत. कॉंग्रेस पक्षालाही एकविसाव्या शतकात नेले पाहिजे, त्यासाठी कार्यकर्त्यांचा आवाज सरकारमध्ये प्राधान्याने ऐकला जाईल. लोकप्रतिनिधी माध्यमे आणि न्यायालयांचा दबाव न स्वीकारता जनतेसाठी आवश्यक कायदे करतील, असे प्रतिपादन कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी नवी दिल्लीमध्ये केले. देशाच्या घटनेप्रमाणे पंतप्रधानांना संसदेचे प्रतिनिधी निवडतात. कॉंग्रेस लोकशाहीला मानणार पक्ष आहे. त्यामुळे पंतप्रधानपदाचा उमेदवार संसदेचे प्रतिनिधी निवडतील, असे सांगत त्यांनी पंतप्रधानपदाची उमेदवारी आत्ताच जाहीर करण्याच्या चर्चेला तूर्त पूर्णविराम दिला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय कॉंग्रेस समितीच्या अधिवेशनात ते बोलत होते.
केंद्रातील कॉंग्रेसच्या नेतृत्त्वाखाली सरकारने गेल्या दहा वर्षांत पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली केलेल्या कामाचा पाढाच त्यांनी वाचला. अत्यंत आवेशात केलेल्या भाषणाला पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार प्रतिसाद दिला.
राहुल गांधी म्हणाले, येत्या लोकसभा निवडणुकीत देशातील १५ मतदारसंघात कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना विचारून त्यांचे मत जाणून घेऊन उमेदवार निवडले जातील. यापूर्वी पक्षाचा जाहीरनामा पक्षातील मोजके नेतेच ठरवीत होते. आता जाहीरनामा तयार करण्यापूर्वी कार्यकर्ता, सर्वसामान्य जनता आणि स्वयंसेवी संघटना यांचे विचार ऐकून घेतले जात आहेत.
गेल्या दहा वर्षांच्या काळात कॉंग्रेसच्या नेतृत्त्वाखालील सरकारने सर्वसामान्यांचे हात बळकट केले. माहिती अधिकार, लोकपाल कायदा या माध्यमातून सत्ता सामान्यांपर्यंत पोहोचवली. आधार कार्ड, रोजगार हमी योजनेच्या माध्यमातूनही सर्वसामान्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम कॉंग्रेसने केले, असे सांगून राहुल गांधी म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून लोकप्रतिनिधींचा आवाजच कोणी ऐकून घेत नाही. कायदे बनविण्याच्या कामात त्यांना काही महत्त्व राहिलेले नाही. माध्यमे आणि न्यायालये यांच्यानुसारच कायदे बनविले जात आहेत. यापुढे हे चालणार नाही, लोकप्रतिनिधींचा आवाज प्राधान्यांने ऐकून घेतला जाईल.
विरोधकांवर हल्ला
देशात सध्या काही विरोधक केवळ चमकोगिरी करण्यात पटाईत आहेत. केस गळालेल्या माणसाला कंगवा विकण्याची यांची प्रवृत्ती आहे. त्यांच्या भूलथापाना बळी पडू नका, सच्चेपणाने वागणाऱयांचा विचार करा, असेही राहुल गांधी म्हणाले.
१२ सिलिंडर द्या
देशातील जनतेला देण्यात येणाऱया अनुदानित सिलिंडरची संख्या नऊवरून १२ करण्याची मागणी राहुल गांधी यांनी पंतप्रधानांकडे केली. नऊ सिलिंडरमध्ये सर्वसामान्य कुटुंबीयांचे घर चालवणे अवघड असल्यामुळे अनुदानित सिलिंडरची संख्या नऊवरून १२ करण्याची मागणी त्यांनी केली.