भारत- पाकिस्तानदरम्यानची नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असतानाही भारत ‘आक्रमणखोर’ असल्याचा कांगावा करीत पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या असेम्ब्लीने भारताचा धिक्कार करणारा ठराव एकमुखी संमत केला. या समस्येची दखल आंतरराष्ट्रीय समुदायाने घ्यावी, असे आवाहनही या ठरावात करण्यात आले आहे.
पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या असेम्ब्लीत ३७१ सदस्य आहेत. पंजाबचे कायदामंत्री मुज्तबा शौजर रेहमान यांनी मांडलेला हा ठराव सर्व सदस्यांनी एकमुखाने मंजूर केला. भारतीय सैन्याने गेले काही दिवस सीमेपलीकडून सातत्याने चालवलेल्या गोळीबारात सियालकोट जिल्ह्य़ात पाकिस्तानचे किमान १० नागरिक ठार झाले आहेत. भारत आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन करीत असून आंतरराष्ट्रीय समुदायाने भारताच्या या आक्रमक वृत्तीची गंभीर दखल घ्यावी, असे आवाहन या ठरावात करण्यात आले आहे.
या ठरावाला पंजाबमधील पाकिस्तान पीपल्स पार्टी आणि पीएमए-क्यू या विरोधी पक्षांनीही पाठिंबा दिला. पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री शहाबाज शरीफ हे पाकिस्ताने पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे धाकटे बंधू आहेत, हे लक्षणीय.