पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याची पुन्हा एकदा आगळीक केली आहे. जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्य़ातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील भारतीय ठाणी आणि नागरी क्षेत्रावर सैन्याने गोळीबार करून बॉम्बहल्ले चढविले आहेत.
पूंछ जिल्ह्य़ातील दोडा बटालियन क्षेत्रात पाकिस्तानी सैन्याने मंगळवारी सकाळी गोळीबार केला, मात्र त्याला भारतीय जवानांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले. या गोळीबार आणि बॉम्बहल्ल्यात जीवित अथवा वित्तहानी झाली नाही, असे संरक्षण दलाचे प्रवक्ते एस. एन. आचार्य यांनी सांगितले.
पाकिस्तानच्या सैन्याने शेरशक्ती, केरनी, बांदी, चाचिया आणि शाहपूर येथे बॉम्बहल्ले केले. इतकेच नव्हे तर नागरी क्षेत्रातही हल्ले चढविल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. बालकोटे आणि मेंढर उपक्षेत्रात दोनदा गोळीबार करून पाकिस्तानी सैन्याने सोमवारीही शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते.