सर्वोच्च न्यायालयाने कोळसा खाणवाटपाबाबत दिलेला निकाल ही पारदर्शीपणे खाणवाटप करण्यासाठी मिळालेली नवीन संधी आहे, असे मी मानतो. आणि म्हणूनच अमेरिकी कंपन्यांनी पायाभूत सुविधांसह भारतात सर्वच महत्त्वाच्या क्षेत्रांत गुंतवणूक करण्याची संधी साधायला हवी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी बोलताना केले.
अमेरिकेतील ११ प्रमुख कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी भारतीय पंतप्रधानांनी संवाद साधला. गेल्या काही वर्षांत परकीय गुंतवणुकीचा आटलेला ओघ पुन्हा एकदा सुरू व्हावा यासाठी नरेंद्र मोदी यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्या प्रयत्नांचाच हा एक भाग होता. पेप्सिको इंडियाच्या इंद्रा नूयी, गुगलचे अध्यक्ष एरिक श्मिडट्, सीटीग्रुपचे प्रमुख मायकेल कॉरबॅट आदींचा त्यात समावेश होता. या सर्व अधिकाऱ्यांनी भारतात उद्योग व गुंतवणुकीत येणाऱ्या अडथळ्यांची मोदी यांना कल्पना दिली. त्यावर भारतात उद्योगस्नेही वातावरण निर्माण करण्याचे आश्वासन मोदी यांनी दिले. भारतीय पंतप्रधानांसह झालेली ही भेट व चर्चा अत्यंत सकारात्मक होती. आमच्या शंका आणि विनंत्या त्यांनी समजून घेतल्या आणि प्राधान्यक्रमही ठरवून घेतले, अशी प्रतिक्रिया नूयी यांच्यासह सर्वच उद्योजकांनी व्यक्त केली.
‘भारत उदारमतवादी असून बदलांच्या प्रतीक्षेत आहे. म्हणूनच मी गुंतवणूकदार, उद्योजक आणि नागरिकांशी चर्चा करीत आहे,’ असे भारतीय पंतप्रधानांनी या बैठकीत सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकावारीस वृत्तपत्रांमध्ये फारसे स्थान मिळाले नव्हते. मात्र, मॅडिसन स्क्वेअरमधील अभूतपूर्व लोकप्रतिसादानंतर सर्वच आघाडीच्या वृत्तपत्रांनी मोदींवरील वार्ताकनास अग्रक्रम दिला.

क्षणचित्रे
* पर्यटन, कौशल्य विकास आणि पायाभूत सुविधांच्या विकासास प्राधान्य
* ११ कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह सुमारे तासभर चर्चा
* बोइंग, केकेआर, ब्लॅकरॉक, आयबीएम, जनरल इलेक्ट्रिक आणि गोल्डमन सॅकच्या अधिकाऱ्यांशी स्वतंत्र चर्चा
* भारतात नवीन नोकऱ्या देण्याची मोठ्ठी संधी असल्याचे पंतप्रधानांचे आवाहन