गेल्या काही दिवसांमध्ये निवडणुकीच्या रणांगणात झालेले मानहानीकारक पराभव आणि पक्षाची सुरू असलेली पडझड या पार्श्वभूमीवर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापासून सुरूवातीचे काही दिवस दूर राहणार आहेत. त्यांना काही दिवस सक्रीय राजकारणापासून दूर राहायचे असून या काळात ते पक्षाची आगामी रणनीती काय असेल यावर विचारमंथन करतील. शुक्रवारी नवी दिल्ली येथे संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाली. त्यामुळे अनेक अर्थांनी महत्त्वाच्या असणाऱ्या या अधिवेशनात राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेस कशाप्रकारे कामगिरी करणार याकडे, सगळ्यांचे लक्ष लागले होते. मात्र, राहुल गांधी सुरूवातीचे काही दिवस अधिवेशनाला हजर राहणार नसल्याचे समजते. सूत्रांच्या माहितीनूसार, सद्यस्थितीतील राजकीय वातावरण आणि काँग्रेस पक्षाची भविष्यातील वाटचाल यासंदर्भात व्यक्त होण्यासाठी राहुल यांनी काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे आणखी काही वेळ मागितला आहे. ते आणखी किती काळ सक्रिय राजकारणापासून दूर राहणार याबद्दल निश्चित माहिती मिळालेली नाही. मात्र, ते काही आठवड्यांच्या विश्रांतीनंतर परततील, असा अंदाज काँग्रेसमधील सूत्रांकडून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे ते सुरूवातीचे काही दिवस अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उपस्थित नसतील. देशभरात पक्षाला लागलेली उतारकळा पाहता काँग्रेसला पुनरूज्जीवीत करण्यासाठी ठोस अशा योजनेची गरज असतानाच राहुल यांची अनुपस्थिती अधिक डोळ्यात भरणारी आहे. पुढील महिन्यामध्ये काँग्रेस पक्षाला नव्या जोमाने उभे करण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस समितीची (एआयसीसी) बैठकही होणार असल्याचे समजते. या बैठकीत पक्षाच्या भविष्यातील वाटचालीविषयी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार असल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर तयारीसाठी राहुल यांना काही वेळ हवा आहे. मात्र, काही आठवड्यांच्या विश्रांतीनंतर राहुल गांधी नव्या जोमाने राजकारणात सक्रिय होतील असे काँग्रेसमधील सूत्रांकडून सांगितले जात आहे.