भारतीय रेल्वेकडून जुलै महिन्यात स्पेशल डबल डेकर ट्रेन सुरु करण्यात येणार आहे. रात्रभरात करता येणाऱ्या प्रवासासाठी या डबल डेकर ट्रेन सुरु करण्यात येणार आहेत. दिल्ली-लखनऊसारख्या सर्वाधिक मागणी असलेल्या मार्गांवर डबर डेकर ट्रेन चालवण्यात येणार आहेत. या ट्रेनमध्ये वातानुकूलित यंत्रणा असेल.

‘उत्कृष्ट डबल डेकर एसी यात्री एक्स्प्रेस किंवा उदय एक्स्प्रेस असे या नव्या ट्रेनचे नाव असेल,’ अशी माहिती रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. या ट्रेनमध्ये स्लीपर बर्थऐवजी आरामदायी आसने असणार आहेत. या ट्रेनच्या एका डब्याची क्षमता १२० प्रवासी इतकी असेल. नव्या ट्रेनच्या डब्यात गरम खाद्य आणि पेय पदार्थांच्या वेन्डिंग मशीन्सदेखील असणार आहेत. ‘नव्या ट्रेन सर्वाधिक प्रवासी संख्या असलेल्या दिल्ली-लखनऊसारख्या मार्गांवर चालवल्या जातील. या ट्रेनचे तिकीट ३ एसी क्लासच्या तिकीटापेक्षा कमी असेल. मात्र या ट्रेनमध्ये मेल आणि एक्स्प्रेसच्या तुलनेत अधिक सोयी सुविधा असतील,’ अशी माहिती रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

नव्या डबल डेकर एसी ट्रेनमधील प्रत्येक डब्यात एलसीडी टेलिव्हिजन स्क्रीन असेल. यावर सुरु असलेले कार्यक्रम वाय-फायने जोडलेल्या हेडफोनच्या मदतीने प्रवासी ऐकू शकतील. ‘नव्या डबल डेकर ट्रेन रात्रीच्या प्रवासासाठी वापरल्या जाणार असल्या, तरी त्यामध्ये स्लीपर बर्थ असणार नाहीत. त्याऐवजी आरामदायी आसने आणि इतर अनेक सोयी सुविधा देऊन प्रवासाचा दर्जा सुधारण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे,’ अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली.

नव्या ट्रेनमधील आसने आरामदायी असतील. प्रवाशांना त्रास होऊ नये, यासाठी दोन आसनांमध्ये पुरेसे अंतर असणार आहे. यासोबत ट्रेनमधील अंतर्गत रचना अत्याधुनिक पद्धतीने करण्यात येणार आहे. यासोबतच प्रत्येक डब्यात विमानाप्रमाणाचे बायो-टॉयलेट्स असणार आहेत. या ट्रेनचा वेग ११० किलोमीटर प्रतितास इतका असणार आहे.