ब्रिटनमधील मॅंचेस्टर येथे घडलेल्या हल्ल्याचा आम आदमी पार्टीचे नेते कुमार विश्वास यांनी निषेध केला. ते म्हणाले, ब्रिटन आणि अमेरिकेने भारतासोबत येऊन पाकिस्तानविरोधात लढा उभारण्याची वेळ आली आहे. त्यामुळे येत्या काळात या तीन देशांनी मिळून एकत्र येऊन पाकिस्तानला धडा शिकवायला हवा.

सोमवारी रात्री पॉप गायिका अॅरियाना ग्रॅंड हिच्या कॉन्सर्टमध्ये दोन स्फोट झाले. त्यामध्ये २० जण जागीच ठार झाले असून, ५० जण जखमी आहेत. हा दहशतवादी हल्ला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. २१ हजार नागरिक बसू शकतील इतकी या सभागृहाची क्षमता आहे. हल्ल्यानंतर मॅंचेस्टर येथे आपात्कालिन सुविधा सुरु करण्यात आली असून, व्हिक्टोरिया रेल्वे स्टेशनपासूनची रेल्वे सुविधा बंद करण्यात आल्याचे पोलिस यंत्रणेकडून सांगण्यात आले.

कुमार विश्वास यांनी या हल्ल्याविषयी एक ट्विटही केले आहे. या माध्यमातून त्यांनी काव्यात्मक रुपाने आपल्या भावना व्यक्त केल्या. या हल्ल्याबाबत ते म्हणतात, असे लोक कसे असतात जे बाँब बनवतात, यांच्याहून चांगले तर रेशीम बनविणारे किडे असतात.

या हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही निषेध व्यक्त केला. हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत असे ट्विट मोदी यांनी केले.