पश्चिम बंगाल या राज्याला आता नवीन ओळख मिळणार आहे. पश्चिम बंगाल विधानसभेने राज्याचे नाव बदलण्याचा प्रस्ताव मंजूर केला असून आता हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. केंद्राकडून हिरवा कंदील मिळाल्यावर पश्चिम बंगालला बंगाली भाषेत बांगला, इंग्रजीत बेंगाल आणि हिंदीत बंगाल या नावाने ओळखले जाईल.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काही दिवसांपूर्वीच पश्चिम बंगाल या विद्यमान नावावर नाराजी व्यक्त केली होती. केंद्र आणि राज्यांमधील संबंधावर आधारित एका जाहीर कार्यक्रमात ममता बॅनर्जी म्हणाल्या, इंग्रजी अक्षरांप्रमाणे डब्ल्यू हे अक्षर सर्वात शेवटी येते. त्यामुळे आम्हाला नेहमीच सर्वात शेवटी बोलायला संधी मिळते असे त्यांनी म्हटले होते. पश्चिम बंगालमधील अनेक प्रशासकीय अधिकारी आणि अन्य मंत्र्यांनीही वारंवार हा मुद्दा उपस्थित केला आहे.
सोमवारी पश्चिम बंगाल विधानसभेत बहुमताने राज्याच्या नामकरणाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. नामकरणाचा प्रस्ताव मंजूर झाल्याचा आम्हाला अभिमान वाटतो अशी प्रतिक्रिया पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिली. ज्या लोकांनी या प्रस्तावाला विरोध केला त्यांना इतिहासात माफ केले जाणार नाही अशी टीकाही त्यांनी नामकरणाला विरोध करणा-यांवर केली आहे.
फाळणीच्या वेळी ब्रिटीश राज्यकर्त्यांनी बंगालचे पश्चिम बंगाल आणि पूर्व बंगाल असे विभाजन केले होते. यातले पूर्व बंगाल हे पाकिस्तानच्या ताब्यात होते. १९७१ मध्ये पूर्व बंगालला पाकिस्तानमधून स्वातंत्र्य मिळाले आणि बांगलादेश अस्तित्वात आला. पूर्व बंगालच अस्तित्वात  नसेल पश्चिम बंगाल नावाची गरज काय  असा सवाल पश्चिम बंगालकडून नेहमीच विचारला जायचा.