सहारनपूरमध्ये मंगळवारी संध्याकाळी जातीय हिंसाचार उफाळल्यानंतर आज दुसऱ्या दिवशीही परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात स्थानिक प्रशासन अपयशी ठरले आहे. त्यामुळे राज्य सरकारने जिल्हाधिकारी एन. पी. सिंह, पोलीस अधीक्षक एस. सी. दुबे, उपजिल्हाधिकारी आणि मुख्याधिकाऱ्यांना पदावरून हटवले आहे. हिंसाचार रोखण्यात अपयशी ठरल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणात पोलीस महासंचालकांनाही फटकारले. दरम्यान, बुधवारीही जनकपुरी येथील जनता रोडवर एका व्यक्तीची गोळी घालून हत्या करण्यात आली. तर बडगावात दोघांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले.

हिंसाचाराच्या घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण परिस्थिती आहे. परिसरात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणी आतापर्यंत २४ जणांना अटक करण्यात आली आहे. हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने १५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तर सर्व जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, गेल्या तीन आठवड्यांतील हिंसाचाराची ही चौथी घटना आहे. मंगळवारी बसप प्रमुख मायावती सहारनपूरच्या दौऱ्यावर गेल्या होत्या. त्यांच्या दौऱ्यानंतर तेथे हिंसाचार उफाळला आणि शब्बीरपूरहून परतणाऱ्या बसप कार्यकर्त्यांच्या वाहनावर जमावाने हल्ला चढवला होता. यात सहा जण जखमी झाले होते. तसेच चंदपुरा येथेही एका समाजाच्या गटाने काही जणांना मारहाण केली होती. तसेच गोळीबारही केला होता.या दोन्ही घटनांमधील जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

[jwplayer 9xaU4cUi-1o30kmL6]