सीएसआयआर अमृतमहोत्सवात पंतप्रधानांचे प्रतिपादन

पाणी व जमिनीच्या घटत्या स्रोतांचे प्रमाण लक्षात घेताना पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी वैज्ञानिक उत्तरे शोधण्याची गरज आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. सीएसआयआरच्या अमृतमहोत्सवानिमित्त ते बोलत होते. दर थेंबागणिक अधिक पीक. आपण प्रत्येक इंच जमीन व मोठय़ा प्रमाणात पीक असा दृष्टिकोन असला पाहिजे असे मत व्यक्त करताना ते म्हणाले, की एकविसाव्या शतकात तंत्रज्ञानाला महत्त्व आहे व भारताच्या गरजा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सोडवल्या जाऊ शकतात.

विज्ञान हे सामान्य नागरिकांशी जोडले गेले पाहिजे. सीएसआयआरचे योगदान मोठे असून, ते यापुढेही कायम राहील असे आपल्याला वाटते. विज्ञान व औद्योगिक संशोधन परिषद म्हणजे सीएसआयआरच्या ७५व्या स्थापनादिनानिमित्त त्यांनी सांगितले, की सीएसआयआरने तंत्रज्ञान उद्योग सोपा करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, त्यासाठी तंत्रज्ञान लाभार्थीपर्यंत पोहोचवण्यासाठी एक मंच स्थापन केला पाहिजे. आधुनिक भारताच्या विकासात गेल्या पंचाहत्तर वर्षांत सीएसआयआर या संस्थेने मोठे काम केले आहे. आगामी काळातही वैज्ञानिकांनी मोठे काम उभे करण्याची गरज आहे.