चीन आणि भारतातील वाढते प्रदूषण अतिशय चिंताजनक असल्याचे अमेरिकेन अंतराळवीर स्कॉट केली यांनी म्हटले आहे. स्कॉट केली वर्षभर अंतराळात राहिले आहेत. ‘भारत आणि चीनमध्ये नेहमी खूप प्रदूषण असते,’ असे केली यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे. व्हाईट हाऊसच्या ओवल ऑफिसमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्यासोबत स्कॉट केलीने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

‘गेल्या उन्हाळ्यातील एका दिवशी मला पूर्व चीनचा एक भाग स्पष्ट दिसत होता. मी त्याआधी चीनमधील तो भाग कधीच अवकाशातून पाहिला नव्हता. ते माझ्यासाठी खूपच धक्कादायक होते,’ असे केली यांनी म्हटले.

‘चीनच्या त्या भागात जवळपास २०० शहरे आहेत. त्यांची लोकसंख्या काही लाखांच्या घरात आहे. मी त्यादिवशी ती सर्व शहरे पाहू शकतो. त्याआधी त्या शहरांवर धुराचे साम्राज्य दिसायचे. मात्र त्यादिवशी मी पहिल्यांदा त्या शहरांना पाहू शकत होतो,’ असे केली पुढे म्हणाले.

‘चीनमधील त्या शहरांना मी पहिल्यांदाच अवकाशात पाहात होतो. मला दुसऱ्या दिवसापर्यंत काहीच समजत नव्हते. त्यानंतर मला चीन सरकारने त्या भागातील कोळशाचे उद्योग बंद करण्याचा, त्या भागात गाड्यांचा वापर बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे समजले. त्यामुळेच तो भाग मला अवकाशात अगदी सुस्पष्ट दिसत होता,’ असे केलींनी म्हटले आहे.

‘यावरुन पर्यावरणावर किती वाईट परिणाम झाला आहे, याची तुम्हाला कल्पना येईल. मात्र प्रयत्न केले तर पर्यावरणाची हानी रोखता येऊ शकेल, ही यामधील सकारात्मक बाब आहे,’ अशी पुस्तीही केली यांनी जोडली.

अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामांनी स्कॉट केली यांचे वर्णन अमेरिकन हिरो म्हणून केले आहे. केली अवकाशात एक वर्ष पूर्ण करुन परतले आहेत. अमेरिकेकडून अशी कामगिरी करणारे ते पहिलेच अंतराळवीर आहेत.

‘केली यांनी अवकाशात राहून फक्त विक्रमच केलेला नाही. केली यांनी अवकाशात इतका दिर्घकाळ मुक्काम केल्याने अंतराळवीर म्हणून त्याच्या शरीरावर काय परिणाम होतात, याचा अभ्यास करण्याची संधी आम्हाला मिळाली. केलीला जुळा भाऊ असल्याने त्या दोघांच्या शारिरीक स्थितीची तुलनादेखील करता आली,’ असे ओबामा यांनी म्हटले आहे.