नाराज शरद यादवांनी मौन सोडले, पक्ष सोडण्याबाबतचा निर्णय मात्र गुलदस्त्यात

भाजपबरोबर पुनश्च घरोबा करण्याच्या बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या निर्णयाविरुद्ध असलेली नाराजी ज्येष्ठ नेते शरद यादव यांनी सोमवारी सकाळी उघड केली. नितीशकुमारांनी जनादेशाचा अनादर केल्याचा आरोप त्यांनी ठेवला, पण संयुक्त जनता दलाला सोडचिठ्ठी देण्याबाबत मौनच बाळगले. मिळालेल्या माहितीनुसार, स्वत:च्या पक्षामध्ये त्यांना घेण्यासाठी लालूप्रसाद यादव प्रयत्न करीत आहेत.

‘हा अतिशय दुर्दैवी निर्णय आहे. त्याच्याशी मी सहमत नाही. बिहारी जनतेने महाआघाडीसाठी जनादेश दिला होता, पण त्याचा अनादर झाला. जनादेशाचा अनादर ही खूप मोठी बाब आहे,’ असे शरद यादव सकाळी संसदेच्या आवारामध्ये म्हणाले. आणखी बोलण्यास त्यांनी नकार दिला, पण नितीशकुमारांवरील नाराजी अजिबात लपविली नाही. सलग दोन दिवस मोदी सरकारवर टीका करून त्यांनी नाराजीची छटा दाखवून दिलीच होती.

लालूप्रसाद आणि काँग्रेसबरोबरील महाआघाडीला रामराम करीत नितीशकुमारांनी पुनश्च भाजपबरोबर जाण्याचा धक्कादायक निर्णय घेतला होता. त्याचे संकेत ते काही महिन्यांपासूनच देत होते, मात्र त्यास शरद यादव यांचा विरोध होता. अगदी निर्णय जाहीर करण्याच्या काही क्षणांपूर्वीही त्यांनी नितीशना सावधगिरीची सूचना केली होती, पण त्याकडे दुर्लक्ष करून नितीश यांनी भाजपशी हातमिळविणी केली. तेव्हापासून यादव मौनात गेले होते. माध्यमांशी बोलण्याचे टाळले; पण विरोधी नेत्यांशी त्यांच्या गाठीभेटी चालू होत्या. मागील तीन दिवसांत त्यांनी राहुल गांधींपासून ते समाजवादी पक्षाच्या नरेश आगरवालपर्यंत अनेकांशी चर्चा केली. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींशीही त्यांनी चर्चा केली. त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न जेटलींना केला.

दुसरीकडे शरद यादवांनी राष्ट्रीय जनता दलामध्ये प्रवेश करण्यासाठी लालूंचे प्रयत्न चालू आहेत. या दोन यादवांमध्ये चर्चेच्या दोन फेऱ्या झाल्याचे समजते आहे. मात्र शरद यादवांना फारसे महत्त्व न देण्याची नितीश यांची भूमिका असल्याचे दिसते. केंद्रीय मंत्री राजीव प्रताप रूडींनी तर शरद यादवांवर थेट टीकाच केली. मंत्रिपद मिळणार नसल्याने शरद यादव अस्वस्थ झाल्याचा त्यांचा अप्रत्यक्ष दावा होता.