दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी दिल्ली पोलिसांच्या कारभारावर पुन्हा एकदा जोरदार टीकास्त्र सोडले असून पोलिसांच्या कारभारात सुधारणा व्हावी म्हणून हस्तक्षेप करण्याची विनंती करणारे पत्र त्यांनी पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग यांना पाठवले आहे.
 दिल्लीत १६ डिसेंबरला झालेल्या सामूहिक बलात्कारानंतर राजधानीतील महिलांची सुरक्षा सुधारण्याचे दिल्ली पोलिसांनी आश्वासन दिले असले तरी त्याची पूर्तता करण्यात अपयश आल्याची टीका त्यांनी केली आहे.
 पंतप्रधानांना पाठवलेल्या पत्रात त्या म्हणतात की, पोलिसांनी आश्वासन दिले असले तरी गेल्या दोन महिन्यांत महिला सुरक्षेबाबतच्या स्थितीत काहीही फरक पडलेला नाही. या प्रश्नात पंतप्रधानांनी गांभीर्याने लक्ष घालून आवश्यक पावले उचलण्याची विनंती त्यांनी केली आहे.  मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनाही असेच पत्र पाठवून राजधानीतील पोलिसांच्या अकार्यक्षमतेकडे लक्ष वेधले आहे.