सिंगापूरमध्ये पर्यायी मातांना इतर स्त्रियांची मुले वाढवण्यासाठी गर्भाशय भाडय़ाने देण्याचे प्रकार मोठय़ा प्रमाणावर होत असून त्यासाठी भारत, मलेशिया, थायलंड व अमेरिकेतील महिला सहा आकडी रकमा घेत आहेत, असे एका अहवालात म्हटले आहे.
असे असले तरी अलिकडेच थायलंडमध्ये घडलेल्या एका वादावरून या पद्धतीवर प्रश्नचिन्ह लागले आहे. एका पर्यायी मातेने डाऊन्स सिंड्रोम झालेल्या बाळाला जन्म दिले. ते बाळ ऑस्ट्रेलियाच्या मातापित्यांनी स्वीकारले नाही, त्यामुळे हा वाद झाला होता. भारतात गेल्या वर्षीपासून पर्यायी मातांनी जन्म दिलेल्या बाळांच्या आईवडिलांनी वैद्यकीय व्हिसा घ्यावा असा नियम केला असून त्यानुसार अर्जदाराला पर्यायी मातेने जन्म दिलेले मूल हे त्यांचे जैविक अपत्य आहे, असे लिहून देण्याचा नियम करण्यात आला आहे. ‘संडे टाइम्स’मध्ये दिल्लीच्या ‘आयव्हीएफ अँड फर्टिलिटी रीसर्च सेंटर’चे डॉ. अनूप गुप्ता यांनी म्हटले आहे, की सध्या आपल्याकडे सिंगापूरहून एकही दांपत्य पर्यायी मातेने बाळाला जन्म द्यावा यासाठी आलेले नाही. सिंगापूरहून पूर्वी पाच ते सहा दांपत्ये पर्यायी मातांच्या शोधात येत असत व ते सिंगापूरला स्थायिक झालेले भारतीय असत. थायलंडचे डॉक्टर्स आता पर्यायी मातांच्या मदतीने मुले जन्माला घालण्याचे तंत्र वापरत नाहीत कारण त्यात वैद्यकीय परवाना रद्द होण्याचा धोका आहे असे सिंगापूरच्या आशियन सरोगेटस संस्थेचे मिखाइल हो यांनी सांगितले. आता आपल्याला भारतात पाठवण्यासाठी ग्राहक शोधावे लागतात असे त्यांचे म्हणणे आहे.
 ‘द नॅशनल कौन्सिल ऑफ इस्लामिक रिलीजियस अफेअर्स’ या मलेशियातील संस्थेने सरोगसी म्हणजे पर्यायी मातेने मुलांना जन्म देण्याविरोधात फतवा काढला आहे. आधी आपण अशा मुले नसलेल्या जोडप्यांना क्वालालंपूर, जोहोर बाहरू, फिलिपिन्स येथील गरीब एकल मातांकडे पाठवत होतो. थायलंडच्या २५ वर्षांच्या पर्यायी माता मुलांना जन्म देत असत. आयव्हीएफ उपचार व एकूण बाळाची काळजी यासाठी थायलंडची वंध्यत्व क्लिनिक एक लाख डॉलर मिळवत असत.
 सिंगापूरमधील तिशी-चाळिशीतील दांपत्यांना आयव्हीएफ  तंत्रही अपयशी ठरल्याने मुले दत्तक न घेता पर्यायी मातांनी वाढवलेली मुले अजूनही हवी असतात व त्यामुळे आता ते सिंगापूरची जोडपी ऑनलाइनवर पर्यायी मातांचा शोध घेत आहेत. एका जर्मन महिलेने मुलाला जन्म देण्यासाठी सिंगापूरमध्ये संपर्क साधून ४२ हजार डॉलर देण्याची तयारी दर्शवली व तिने थायलंड किंवा कॅनडात आयव्हीएफ प्रक्रिया करून घेतली.