उत्तर प्रदेशातील अखिलेश यादव सरकार गुन्हेगार आणि जातीय शक्तींना पाठीशी घालत असल्याचा आरोप बसपच्या नेत्या मायावती यांनी शनिवारी केला. काँग्रेसने सत्तारूढ सपाशी आघाडी करण्याचा प्रयत्न केला ही त्यांची राजकीय दिवाळखोरी असून ही बाब उत्तर प्रदेशात प्राणवायूवर चालणाऱ्या या पक्षासाठी अपायकारक आहे, असेही मायावती म्हणाल्या.

काँग्रेसने कलंकित अखिलेश यादव यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून स्वीकारले आहे, या दोन पक्षांमधील आघाडी बोलणी संपल्यानंतर काँग्रेसचे अनेक नेते बसपात येतील, असेही मायावती म्हणाल्या. काँग्रेस स्वत:ला धर्मनिरपेक्ष समजत असेल तर त्यांनी सपासमवेत जाऊ नये असे आपल्याला त्यांना सांगावयास आवडेल, असेही त्या म्हणाल्या. काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवावी अथवा छोटय़ा धर्मनिरपेक्ष पक्षांसमवेत जावे, असेही त्या म्हणाल्या.गुन्हेगार आणि जातीय शक्तींना सपा पाठीशी घालत असून त्यांचा भाजपशी समझोता झाला आहे, सत्तारूढ सपातील संघर्ष हे नाटक आहे आणि त्यासाठी शिवपाल यादव यांना बळीचा बकरा करण्यात आले आहे. अखिलेश यादव यांची उमेदवारी मान्य करून काँग्रेस सपापुढे झुकले आहे, असेही त्या म्हणाल्या.

अंबिका चौधरी यांचा बसपात प्रवेश

सपाचे नेते मुलायमसिंह यादव यांचे निकटचे सहकारी अंबिका चौधरी यांनी शनिवारी बसपामध्ये प्रवेश केला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यांनी ज्या पद्धतीने मुलायमसिंह यांना वागणूक दिली त्यामुळे आपण व्यथित झाल्याचे चौधरी म्हणाले.