लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदाबात कोणताही स्पष्ट नियम नसला तरी, लोकसभा अध्यक्षांनी त्याबाबत निवड करावी अशी भूमिका माजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चटर्जी यांनी घेतली आहे.
विरोधी पक्षनेतेपद मिळण्यासाठी लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या किमान दहा टक्के जागा हव्यात अशी अट असली तरी, याबाबत अध्यक्षांचा निर्णय अंतिम असतो असे चटर्जीनी स्पष्ट केले. संसदेचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी विरोधी पक्षनेता हवा. त्यामुळे आता अध्यक्षांनीच निवड करावी. अ‍ॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी काँग्रेस विरोधी पक्षनेतेपदासाठी पात्र ठरत नसल्याचा अभिप्राय दिला होता. त्या पाश्र्वभूमीवर चटर्जी यांचे मत महत्त्वाचे आहे. रोहतगी यांनी आपले मत लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांना कळवले आहे. या मुद्दय़ावर काँग्रेस-भाजप यांच्यात खडाजंगी सुरू आहे.  १९८४ मध्ये राजीव गांधी यांच्या कारकिर्दीत काँग्रेसने तेलुगु देसमला विरोधी पक्षनेतेपद नाकारल्याचा दाखलाही भाजपने दिला आहे.
काँग्रेसची टीका चुकीची-नायडू
विरोधी पक्षनेतेपदाचा मुद्दा सरकारच्या अखत्यारीत येत नाही. त्यामुळे यावर सरकार म्हणून मी प्रतिक्रिया देणार नाही, असे संसदीय कामकाजमंत्री वेंकय्या नायडू यांनी स्पष्ट केले, कमलनाथ यांनी सरकार आणि लोकसभा अध्यक्षांवर या मुद्दय़ावर टीका केली आहे ती गैर आहे. आता याबाबत लोकसभा अध्यक्षच निर्णय घेतील, असे नायडू यांनी सांगितले.