तामिळनाडूतील २७ मच्छीमारांना श्रीलंकेच्या नौदलाने बुधवारी रात्री अटक केली. देशाच्या सागरी सीमा ओलांडून परकीय प्रदेशात मच्छीमारी केल्याचा आरोप त्यांच्यावर या वेळी ठेवण्यात आला. परंतु भविष्यात असे कृत्य घडणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी तंबी देऊन नौदलाने त्यांची सुटका केल्याची माहिती सूत्रांनी दिली. जगदपट्टीनाम येथील १३ मच्छीमारांना खोल समुद्रात अटक करण्यात आली. या वेळी त्यांच्या तीन बोटीही हस्तगत करण्यात आल्या. याच वेळी इतर १४ भारतीय मच्छीमारांनाही बुधवारी मध्यरात्री अटक करण्यात आली. लंकेच्या नौदल अधिकाऱ्यांकडून मच्छीमारांच्या जाळ्यांचे नुकसान करण्यात आल्याची माहिती मत्स्य विभागाचे सहाय्यक संचालक शेखर यांनी दिली. गुरुवारी सकाळी कडक तंबी देऊन सर्व मच्छिमारांची सुटका करण्यात आल्याचे ते म्हणाले.